मडगाव : गोव्यातील सर्वात जास्त लोकवस्तीचा तालुका असलेल्या सासष्टी तालुक्यातील कोरोनाचा उद्रेक चिंता वाढविणारा असून आतापर्यंत या तालुक्यातील रुग्णांची संख्या 4296 एव्हढी झाली आहे. 31 ऑगस्ट पर्यंतच्या आकडेवारी प्रमाणे या तालुक्यात एकूण कोविड बळींची संख्या 23 वर पोहोचली असून त्यातील मडगावात सर्वाधिक म्हणजे 10 बळींची नोंद झाली आहे. त्या पाठोपाठ फातोर्डा येथे 7 तर कुंकळी, नावेली आणि कुडतरी येथे प्रत्येकी 2 बळींची नोंद झाली आहे. सध्या या तालुक्यातील सक्रीय रुग्णांची एकूण संख्या 1958 एव्हढी आहे.
आरोग्य खात्याच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 31 ऑगस्टपर्यंत फातोर्डा येथे सर्वाधिक 885 रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 392 रुग्ण सक्रीय आहेत तर जवळच्या मडगाव शहरात 818 रुग्ण आढळून आले असून एकूण सक्रीय रुग्ण 350 आहेत. मडगाव येथील घोगोळ भागात 223 रुग्ण आढळून आले असून या भागात 2 बळींची नोंद झाली आहे. मंगळवारी मडगाव आणि फातोर्डा या परिसरात कोरोनाचे प्रत्येकी 8 रुग्ण आढळून आले होते. मडगाव आरोग्य केंद्रात तपासणी झालेल्यापैकी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 425 वर पोहोचली होती.
औद्योगिक वसाहतीमुळे कोरोनाचा फैलाव झालेल्या कुंकळीत एकूण रुग्णांची संख्या297 वर पोहोचली असून त्यातील 111 सक्रिय आहेत. या परिसरात कोविडमूळे दोघांचा मृत्यू झाला. वेर्णा येथे193 रुग्णापैकी 25 सक्रीय आहेत तर दवर्ली येथे 200 पैकी 113 सक्रिय आहेत, राय येथे 85, नुवेत 80, नावेलीत 79, नेसाय येथे 74 तर कुडतरी येथे 62 रुग्ण आढळून आले आहेत. नावेली आणि कुडतरी येथे प्रत्येकी दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.