वास्को - सोमवारी (दि.२९) सकाळी दक्षिण गोव्यात असलेल्या ‘झुआरी इंडीयन आॅईल टँकींग लिमिटेड’ च्या बाहेरील चौपदरी महामार्गावर टँकर व दुचाकीत झालेल्या भीषण अपघातात २३ वर्षीय संदीप शर्मा या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. संदीप ‘केटीएम’ मोटरसायकल वरून कामावर जाण्यासाठी भरधाव वेगाने जात असताना त्यांने ‘झुआरी इंडीयन आॅईल टँकींग लिमिटेड’ कंपनीत जात असलेल्या टँकरच्या दाव्या बाजूतील पुढच्या चाकाला जबर धडक दिल्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला.
वेर्णा पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार सोमवारी सकाळी ७.१५ च्या सुमारास सदर अपघात घडला. दाबोळी येथे राहणारा संदीप शर्मा वेर्णा औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत कामाला असल्याची माहीती पोलीसांनी दिली. सकाळी कामावर जाण्यासाठी तो आपल्या घराकडून ‘केटीएम’ दुचाकीने (क्र: जीए ०६ व्हाय ६०९४) निघाला होता. संदीप साकवाळ येथील ‘झुआरी इंडीयन आॅईल टँकींग लिमिटेड’ च्या बाहेरील चौपदरी महामार्गावर पोचला असता याचवेळी वेर्णा महामार्गावरून या कंपनीत आत जाण्यासाठी एका टँकरने वळण घेऊन सदर टँकर कंपनीच्या गॅटसमोर पोचला होता. भरधाव वेगाने जात असलेल्या संदीपला त्याच्या दुचाकीवर ताबा आणण्यास अपयश आल्याचे पोलीसांना तपासात जाणवल्याची माहीती सूत्रांनी देऊन त्यांने त्याच्या दुचाकीची समोरून त्या टँकरच्या पुढच्या बाजूच्या डाव्या चाकाला जबर धडक दिली. दुचाकीने जात असलेल्या संदीपने हेल्मेट घातले होते अशी सूत्रांनी दिली, मात्र टँकरला धडक दिल्यानंतर त्याचे डोके जोरात टँकरला आपटून तो रस्त्यावर खाली कोसळला.
सदर अपघाताची माहीती मिळाल्यानंतर १०८ च्या रुग्णवाहीकेने त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या संदीपला उपचारासाठी चिखली येथील उपजिल्हा इस्पितळात नेले. अपघातानंतर संदीपला इस्पितळात आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे चिखली उपजिल्हा इस्पितळातील डॉक्टरांनी येथे घोषित केल्याची माहीती वेर्णा पोलीसांनी दिली. वेर्णा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक प्रवीण सिमेपुरुस्कर यांनी मयत संदीप याच्या मृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर शवचिकित्सेसाठी पाठवून दिला. वेर्णा पोलीस सदर अपघाताचा अधिक तपास करीत आहेत.