लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : विधानसभेचे पावसाळी अधिवेशन येत्या मंगळवारपासून (दि. १८) सुरू होत आहे. या अधिवेशनासाठी ५८९ तारांकित व १,७९८ अतारांकित असे एकूण २,३८७ प्रश्न आले आहेत. विविध प्रश्नांवर सर्व सातही विरोधी आमदारांनी संयुक्तपणे सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचा निर्णय घेतला आहे.
अधिवेशन १० ऑगस्टपर्यंत चालणार असून, १८ दिवसांचे प्रत्यक्ष कामकाज असेल. गेल्या दोन वर्षातील हे अधिवेशन सर्वात जास्त कालावधीचे आहे. या अधिवेशनात अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे. आठ सरकारी विधेयके आतापर्यंत निश्चित झाली असून, यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. खासगी विधेयके, खासगी ठराव लक्षवेधी सूचनाही चर्चेला येतील.
दरम्यान, सातही विरोधी आमदारांनी सरकारला म्हादई, बिघडलेली कायदा-सुव्यवस्था, खाण व्यवसाय, भ्रष्टाचार, इव्हेंट्सवरील उधळपट्टी, दक्षिण गोव्यातील वेस्टर्न बायपास, पिण्याच्या पाण्याची टंचाई या विषयांवर धारेवर धरण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी विधेयके घिसाडघाईने संमत केली जाऊ नयेत. आमदारांना किमान ४८ तास आधी ती दिली जावीत, लक्षवेधी सूचनांची संख्या वाढायला हवी आदी मागण्या गेल्या आठवड्यात कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केल्या आहेत. अलीकडच्या काळात कमी कालावधीची अधिवेशने होत असल्याने विरोधक नाराज होते. गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासगी कामकाजाचा दिवस दिला नाही. त्यामुळे विरोधकांनी आवाज उठविला होता.