लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव : माझी बस योजनेंर्तगत येथील कदंब बस स्थानकावरून शुक्रवारी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांच्या उपस्थितीत २५ बसेस सुरू करण्यात आल्या.
यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल, कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर, मडगावचे आमदार दिगंबर कामत, कदंब महामंडळाचे सरव्यवस्थापक संजय घाटे, वाहतूक खात्याचे संचालक राजन सातार्डेकर, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, प्रितेश गावकर, अखिल गोवा बसमालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर आदी उपस्थित होते.
ही योजना दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात येणार होती, परंतु काही कारणाने ती पुढे गेली नाही. पुढील सहा महिन्यांत कदंब महामंडळासाठी अॅप विकसित केले जाईल. यामुळे प्रवासी बस कुठे पोहोचली हे मोबाइलवरून पाहू शकतील. मडगाव बसस्थानकाची स्थिती अत्यंत वाईट असल्याने या बसस्थानकाच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम खात्यातून ३ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. पणजी शहरात जुन्या बसेस बदलून नव्या बसेस घेण्यात येईल. स्मार्ट सिटी अंतर्गत ४८ बसेस मिळाल्या असून, पुढील दोन आठवड्यांत त्या सुरू करण्यात येतील, अशी माहिती मंत्री गुदिन्हो यांनी दिली.
पहिल्या टप्यात मडगाव, पणजी, म्हापसा व वास्को बसस्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती मंत्री गुदिन्हो यांनी दिली. मंत्री काब्राल यांनी माझी बस योजना बस मालक व कदंब महामंडळ यांच्या सहकार्याने चालणार असल्याने ती नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला. मडगाव बसस्थानकाच्या जागेचा सुसज्ज स्थानक बांधल्यास कदंब महामंडळ स्वयंपूर्ण होईल, असे आमदार कामत यांनी सांगितले.