लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : राज्यात २०२२-२३ या आर्थिक वर्षात काजू उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. यंदा २५ हजार ८०० टन काजू उत्पादन झाले आहे. यात सर्वाधिक उत्पादन सत्तरी तालुक्यात झाले आहे. सत्तरीत ५ हजार ६४५ टन काजू उत्पादन झाले आहे, अशी माहिती कृषिमंत्री रवी नाईक यांनी विधानसभा अधिवेशनात लेखी उत्तरात दिली आहे.
राज्यात काजू उत्पादन वाढावे यासाठी कृषी खात्याकडून विविध सवलती, अनुदान शेतकऱ्यांना दिले जाते. काजू रोपटे, खत खरेदीसाठी अनुदान दिले जाते. रोपटी लावण्यासाठीही कृषी खात्याकडून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर दिले जात आहे. त्याचप्रमाणे आता काजू बियांवर आधारभूत किमतीही दिली जात आहे. या अनेक कारणांमुळे यंदा काजू उत्पादन वाढल्याचे मंत्री नाईक यांनी म्हटले आहे.
राज्यात इतर उत्पादनांपेक्षा काजू उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. गोव्याचा काजूगर जगप्रसिद्ध असल्याने पर्यटकांचा तो आवडीचा आहे. त्यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. त्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. तीन महिन्यांच्या काजू हंगामावर ग्रामीण भागातील अनेक शेतकरी उदरनिर्वाह करतात.
काजू उत्पादन टनात
तिसवाडी १५७५बार्देश २८१९सत्तरी ५६४५फोंडा १६१८केपे ११३७पेडणे ३३५६सांगे १८२१सासष्टी ९९७डिचोली ३६००धारबांदोडा ११३९काणकोण१९००मुरगाव १९३