मडगाव: कुडतरी भागात फैलावलेला कोरोना आटोक्यात येत असतांनाच जवळच्या रासई भागात गुरुवारी आणखी 26 रुग्ण आढळून आल्याने हा भाग नवीन हॉटस्पॉट बनण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान मडगावात मोतीडोंगर भागातही गुरुवारी एक पॉझिटिव्ह आढळून आला.
हे सर्व बाधित 4 कुटुंबातील असून यापूर्वी या वाड्यावर दोघांना कोरोना झाल्याचे आढळून आल्यावर त्यांच्या संपर्कात आलेल्या 123 जणांची चाचणी घेतली होती त्यापैकी 26 पॉझिटिव्ह सापडले.
मिळालेल्या माहितीनुसार वेरणा औद्योगिक वासहतीतून या भागात कोरोना पसरला आहे. यापूर्वी या वाड्यावरील जे दोन बाधित आढळून आले होते ते वेरणा औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत कामाला होते. कामावर असतानाच त्यांना ही बाधा झाली होती.
लोटली आरोग्य केंद्राचे डॉ. विनय गावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या भागातील सर्व संशयितांच्या चाचण्या घेण्यात आल्या असून गरज पडल्यास या भागात रेपीड स्क्रिनिंग केले जाईल.
दरम्यान कंटेन्मेंट झोन शिथील करण्याच्या प्रक्रियेतील एक टप्पा म्हणून कुडतरी येथील कंटेन्मेंट झोन मधील प्रत्येक घरातील एक व्यक्तीची तपासणी सुरू केली होती. त्यात केवळ 24 घरातील व्यक्तींच तपासणीसाठी आल्या सुमारे 15 घरातील व्यक्तींनी चाचणी करून घेतली नाही अशी माहीती मिळाली आहे.
दरम्यान मोती डोंगरावरील ज्या 715 जणांच्या ज्या शेवटच्या चाचण्या झाल्या होत्या त्या सर्वांचे अहवाल आले असून त्यापैकी गुरुवारी 1पॉझिटिव्ह सापडला. यापूर्वी या शेवटच्या सॅपल्समधून तीन व्यक्ती बाधित झाल्या होत्या.