पणजी : कोट्यवधी रुपयांच्या बक्षिसाची आमिषे दाखवून गंडविण्याचे प्रकार गोव्यात सुरूच आहेत. मडगाव येथील एका वृद्धाकडून १७.९३ लाख रुपये, तर कवळे-फोंडा येथील गृहस्थाला आयकर अधिकारी असल्याचे सांगून ८.१६ लाखांना गंडा घातल्याची दोन प्रकरणे रायबंदर येथील सायबर गुन्हा विभागाकडे नोंद झाली आहेत.पहिल्या प्रकरणात मडगाव येथील सर्कन्सियासो फर्नांडिस (७१) या वृद्धाला ३.१५ कोटी रुपयांचे बक्षीस लागल्याची माहिती फोनवरून देऊन त्याच्याकडून शुल्काच्या निमित्ताने आणि विविध करांच्या रूपाने मिळून १७.९३ लाख रुपये उकळले. हे पैसे त्याने संशयिताने दिलेल्या विविध खात्यांत जमा केले. एकूण २५वेळा ही रक्कम जमा करण्यात आली, असे फर्नांडिस यांची पत्नी कॅथरिन यांनी तक्रारीत म्हटले आहे. फोनवरून आणि ईमेलवरून संशयित त्यांच्याशी संपर्कात होते. संशयितांकडून पैसे मागणे चालूच राहिल्यामुळे त्यांना शंका आली आणि त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली. पती वृद्ध असल्यामुळे प्रवास करू शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या वतीने आपण स्वत: तक्रार देत असल्याचे कॅथरिन यांनी तक्रारीत म्हटले आहे.दुसऱ्या प्रकरणात कवळे-फोंडा येथील विनायक पेंडसे नामक गृहस्थाला अज्ञातांनी फोन केला. बँकेचे आयकर खात्याचे अधिकारी असल्याचे सांगण्यात आले. तसेच त्यांच्या बँक खात्याची आणि एटीएमची माहिती घेतली. ते सांगतानाच विनायक यांनी यापूर्वी केलेल्या अंतिम व्यवहाराची माहिती त्यांना दिली. एटीएमचा पीन क्रमांक कुणालाही सांगू नका, असे सांगून संशयिताने त्यांचा विश्वास संपादन केला; परंतु नंतर पीनची माहिती मिळवून पेंडसे यांच्या खात्यातून एका दिवसात ८.१६ लाख रुपये काढले. (प्रतिनिधी)
भामट्यांकडून दोघांना २६.0९ लाखांना गंडा
By admin | Published: March 09, 2017 2:14 AM