सूरज नाईक पवार, मडगाव: भारतीय नौदलात लेफ्टनंट कमांडरची नोकरी देण्याचे आमिष दाखवून गोव्यात एकाला तब्बल २७ लाख ७२ हजारांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी येथील मायणा कुडतरी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा नोंद केला आहे. राजेश नाईक, विश्वा गावडे, अक्षता गावडे, सोनिया आचारी व पुर्णिमा कोळंबकर अशी संशयितांची नावे आहेत.
या सर्वांवर पोलिसांनी भादंसंच्या ४२० कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. पोलिस निरीक्षक रवी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रशांत भगत पुढील तपास करीत आहेत. साईश कोमरपंत हे तक्रारदार आहेत. ते फातोर्डा येथील राजेश नगर येथे राहत आहेत. संशयितांनी त्यांना भारतीय नौदलात लेफ्टनंट कमांडरची नोकरी देऊ असे सांगून त्याच्याकडून २७ लाख ७२ हजार ९५६ रुपये उकळले. रोख व ऑनलाईन बँकिंगद्वारे ही रक्कम घेण्यात आली. २१ नोव्हेंबर २०२० पासून हा प्रकार चालू होता. रुमडामळ-दवर्ली येथे ही घटना घडली होती. रक्कम घेऊनही नोकरी मिळाली नसल्याने फसविलो गेल्याचे लक्षात आल्यानतंर तक्रारदाराने नंतर मायणा कुडतरी पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार नोंद केली.