- नारायण गावस
पणजी: भाजप सरकारच्या काळात बेरोजगारी दर वाढला आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या रिपोर्टनुसार राज्यातील एकूण ९.७ टक्के बेरोजगारी दर आहे. तर १५ ते २९ वयोगटातील बेरोजगारी दर हा २७.४ टक्के आहे. हे भाजप सरकारचे मोठे अपयश आहे, असा आरोप आम आदमी पक्षाचे नेते वाल्मिकी नाईक यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांच्या सोबत आपचे युवा नेते रोहन नाईक व सलमान खान उपस्थित होते.
प्रत्येक निवडणूकीत भाजप सरकार बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासन देत असते. अनेक रोजगार मेळावे आयोजित केले जातात पण प्रत्येक्षात बेरोजगारी कमी होत नाही. एकूण १५ ते २९ वयाेगाटीतील १०० तरुणांमागे २७ तरुण हे बेरोजगार आहेत. या युवकांना सरकारी नोकरी देण्यास अपयश आले आहे, असेही वाल्मिकी नाईक यांनी सांगितले.
आप सरकारने दिल्ली तसेच पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात युवकांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. खासगी तसेच विविध सरकारी क्षेत्रातही नोकऱ्या उपलब्ध करुन दिल्या आहेत. पण गोव्या सारख्या लहान राज्यात सरकारला बेरोजगारी कमी करण्यास अपयश आले आहे. हे सरकार फक़्त भ्रष्टाचार, जमिन विक्री तसेच आपल्या स्वार्थासाठी काम करत आहे. या लोकांना युवकांचे काहीच पडलेले नाही असा अरोपही वाल्मिकी नाईक यांनी केला आहे.
रोजगार मेळाव्यावर श्वेत पत्रिका काढागेल्या वर्षी श्यामाप्रसाद मुखर्जी मैदानावर २.६० कोटी रुपये खर्च करुन मोठा रोजगार मेळावा आयोजित केला होता. यात राज्यभरातून हजारो बेरोजगार युवकांनी हजेरी लावली होती. यातील किती युवकांना नोकऱ्या दिल्या हे सरकारने जाहीर करावे. तसेच त्यांना किती पगाराची नोकरी दिले हे सांगावे. आज अनेक सुशिक्षित युवकांना ८ ते १० हजार रुपयांची नोकरी दिली जात आहे. यात ते आपला खर्च तसेच कुटुंबाचे पालन पोषण कसे करणार याचा सरकारने विचार करणे गरजेचे आहे, असे आपचे युवा नेते रोहन नाईक यांनी सांगितले.