वास्को: दक्षिण गोव्यातील मेस्तावाडा, वास्को येथील २९ वर्षीय सर्वेश सावळो नाईक हा तरुण बुधवारी (दि.५) लोखंडी पाईप घेऊन नारळाच्या झाडावरील शहाळी काढताना पाईपचा स्पर्श वीज खांब्यावरील तारेला झाल्याने त्याला वीजेचा झटका बसून तो मरण पावला. सर्वेश याला वीजेचा झटका बसल्याने तो जमनिवर कोसळल्याचे तेथे असलेल्या लोकांच्या नजरेस येताच त्यांनी त्याला उपचारासाठी इस्पितळात नेले, मात्र इस्पितळात आणण्यापूर्वीच तो मरण पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्याची माहीती पोलीसांनी दिली.
वास्को पोलीस स्थानकाच्या उपनिरीक्षक प्रज्योती देसाई यांनी दिलेल्या माहीतीनुसार बुधवारी दुपारी ३ च्या सुमारास सदर घटना घडली. मेस्तावाडा, वास्को येथे राहणारा सर्वेश नाईक हा तरुण तेथील रेल्वे ‘गॅस्ट हाऊस’ परिसरातील नारळाच्या झाडावरील लोखंडी पाईप च्या मदतीने शहाळी काढत होता. एक शहाळे काढल्यानंतर तो दुसरे काढण्याच्या प्रयत्नात असताना त्याचा तोल जाऊन हातातील लोखंडी पाईप मागच्या बाजूने जाऊन पाईपचा स्पर्श तेथे असलेल्या वीज खांब्यावरील तारेला झाला. सर्वेशला जबर वीजेचा झटका बसून तो जमनिवर कोसळला. या भागात राहणाºया नागरिकांनी सर्वेश वीजेचा झटका बसल्याने खाली कोसळल्याचे पाहील्यानंतर त्यांनी त्वरित १०८ रुग्णवाहीकेला बोलवून नंतर त्याला उपचारासाठी चिखली उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले. इस्पितळात पोचण्यापूर्वीच सर्वेश याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून घोषित करण्यात आल्याची माहीती पोलीस उपनिरीक्षक प्रज्योती देसाई यांनी दिली. सर्वेश जेव्हा शहाळी काढत होता त्यावेळी त्याच्याबरोबर अन्य काही तरुण होते अशी माहीती सूत्रांकडून मिळाली आहे. पोलीसांनी सर्वेश याच्या मृतदेहाचा पंचनामा करून नंतर तो मडगाव येथील इस्पितळाच्या शवगृहात पाठवून दिला आहे. गुरूवारी त्याच्या मृतदेहावर शवचिकित्सा केल्यानंतर त्याचा मृतदेह कुटूंबाच्या ताब्यात देण्यात येणार आहे. वास्को पोलीस स्थानकाच्या उपनिरीक्षक प्रज्योती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रकरणाचा अधिक तपास चालू आहे.