पणजी : सार्वजनिक बांधकाम खात्याच्या टोंक-सांतिनेज येथील सिवरेज प्लांटच्या कार्यालयात महिला वापरत असलेल्या टॉयलेटमध्ये संशयित विनायक गोवेकर (२४) हा मागील तीन महिन्यांपासून गुप्त कॅमेऱ्याने फिल्मिंग करत होता, अशी माहिती पोलीस चौकशीतून उघडकीस आली आहे. या कार्यालयाच्या महिला आणि पुरुष वापरत असलेल्या टॉयलेटमध्ये मोबाईलद्वारे गुप्तपणे व्हिडिओ चित्रीकरण करण्याचे प्रकरण उघडकीस आल्यामुळे संशयित गोवेकर याला पोलिसांनी गुरुवारी अटक केली होती. नोव्हेंबर महिन्यापासून त्याने हा प्रकार चालविला होता. तसेच त्याने टिपलेले अनेक व्हिडिओ पोलिसांनी जप्त केले आहेत. आपल्या गुन्ह्याची कबुली संशयिताने दिली आहे; परंतु ते व्हिडिओ त्याने कुणालाही पाठविले नाहीत, असे तो पोलिसांना सांगत आहे. या खात्याच्या कार्यालयात महिला आणि पुरुषांसाठी एकच टॉयलेट आहे. त्यामुळे सर्वांकडून तो वापरला जात आहे. संशयित गोवेकर हा या कार्यालयात लॅब अटेंडंट म्हणून कामाला आहे. त्याने आपला मोबाईल या टॉयलेटमधील एका झाडूत लपवून ठेवला होता. कॅमेरा चालू ठेवल्यामुळे त्यातून रेकॉर्डिंग चालूच होते. टॉयलेटमध्ये गेलेल्या एका महिलेच्या नजरेस ही गोष्ट आल्यामुळे तिने लगेच हा मोबाईल उचलला आणि आपल्या सहकारी महिला कर्मचाऱ्यांना हा प्रकार सांगितला. महिला कर्मचारी तो मोबाईल घेऊनच पणजी पोलीस स्थानकात गेल्या. या मोबाईलमध्ये त्यातून टिपलेले आक्षेपार्ह व्हिडिओ पोलिसांना आढळले. त्यानंतर कार्यालयात जाऊन पोलिसांनी संशयिताला शोधून काढले आणि त्याला अटक करून पोलीस स्थानकात आणले. संशयित हा मेरशी येथील असून एक वर्षापूर्वीच तो प्रयोगशाळेत साहाय्यक म्हणून कामाला लागला होता. त्याची आईही याच कार्यालयात कामाला असते. (प्रतिनिधी)
३ महिने सुरू होते महिलांच्या टॉयलेटमध्ये फिल्मिंग
By admin | Published: February 21, 2015 2:17 AM