फोंडा- मोले चेक नाक्यावर नक्की चालले आहे काय असे म्हणण्याची पाळी उद्धवली असून आज पुन्हा एकदा पावणे आठ लाखाची दारू अनमोड येथे पकडण्यात आली जी सही सलामत मोले चेक नाक्यावरून सुटली होती. मागच्या आठ दिवसात अनमोड मध्ये पकडली गेलेले हे तिसरी खेप असून, एकूण ७५ लाखाची दारू आठ दिवसातच अनमोड मध्ये पकडण्यात आली आहे. चोरटी निर्यात सीमेबाहेर होऊ नये म्हणून चेक नाके असतात. परंतु चेक नाक्यावरूनच जर सही सलामत चोरीचा माल सीमा रेषे बाहेर जाऊ लागला तर चेक नाक्याची गरजच काय असा सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत.
सविस्तर वृत्तानुसार गोवा येथून कर्नाटकात जाणाऱ्या मिनी टेंपो मधून शुक्रवारी सकाळी अनमोड चेक नाक्यावर अबकारी खात्याने मोठी कारवाई करून दारू साठा जप्त केला. वाहन व दारू सहित अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी सुमारे ७ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी रवी मंजीलिती व वेंकटरमण गौडा याना अटक करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार शुक्रवारी सकाळी मोले येथून एपी -०४- टीझेड - ०७२७ क्रमांकाची मिनी टेंपो आंध्र प्रदेश येथे जात होती. अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी मिनी टेंपोची तपासणी केली असता मागच्या बाजूने लपून ठेवलेला दारूचा साठा आढळून आला. यात २६४ लिटर बियर व १६१ लिटर अन्य दारू साठ्याचा समावेश आहे. अधिकाऱ्यांनी याप्रकरणी चालकसह अन्य एकाला अटक केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून अनमोड अबकारी खात्यातर्फे कडक मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे वारंवार दारूचा साठा जप्त करण्यात येत आहे.सदरच्या प्रकरणामुळे मोले चेक नाक्यावरील अधिकाऱ्यांची पोलखोल होत असून, मिळालेल्या माहितीनुसार अधिकारी आत बसून असतात तर सेक्युरिटी गार्ड किंवा होमगार्ड यांना तपासणीसाठी पाठवले जाते.