पणजीः 9 हजार रुपयांचा धनादेश देण्यासाठी 3 हजार रुपये लाच मागणाऱ्या सनी मळीक या गोवा डेअरीच्या ज्येष्ठ पर्यवेक्षकाला भ्रष्टाचार विरोधी पथकाने लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्याच्याबरोबर त्याचा सहकारी मंजित सिंग यालाही अटक करण्यात आली.
ही कारवाई एसीबीकडून सोमवारी संध्याकाळी करण्यात आली. गोवा डेअरीचे पर्यवेक्षक म्हणून काम पाहाणारे मळीक हे डेअरीच्या दूध वितरकांकडून लाच घेत होते. त्यांच्या हक्काचे पैसे त्यांना मिळविण्यासाठी या अधिकाऱ्याला लाच द्यावी लागत होती. काही जण मुकाट्याने देत होते. परंतु बाळकृष्ण चौहाण या वितरकाने त्याचा चांगलीच अद्दल घडविली. लाचेची रक्कम देतो असे सांगून त्याची माहिती एसीबीला दिली. एसीबीने सापळा रचला. लाचेची रक्कम देण्याची जागा ही म्हापसा येथील बसस्टँड जवळचा गोवा डेअरीचा बूथ ठरविण्यात आला. नियोजनानुसार लाच घेताना मळीक याचा सहकारी असलेला मंजित सिंग याला रंगेहाथ पकडले. मंजितला पकडल्यानंतर पुन्हा सापळा रचून मंजितकडून ही रक्कम घ्यायला आलेल्या मळीकला पैसे घेत असतानाच एसीबीकडून अटक करणयात आली. दोघांवरही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. एसीबीच्या अधीक्षक प्रियंका कश्यप यांंनी ही माहिती दिली. निरीक्षक गुुरुदास कदम या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
दरम्यान दोन महिन्यापूर्वी गोवा डेअरीच्या आणखी एक लाचखोर अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. गोवा डेअरीत भ्रष्टाचार व लाचखोरीला उत आला असून हे प्रकरण न्यायालयातही पोहोचले आहे.