किशोर कुबल, पणजी: औद्योगिक विकास महामंडळाने लाटंबार्से व वेर्णा येथे मिळून ३१ भूखंड भाडेतत्त्वावर लिलांवात काढले आहेत. या भूखंडांच्या ई लिलांवासाठी इच्छुकांकडून बोली मागवल्या आहेत. लाटंबार्से औद्योगिक वसाहतीत ७४0 चौ. मि. पासून २,५५९ चौ. मि. पर्यंतचे भूखंड भाडेतत्त्वावर उपलब्ध केले आहेत. ई लिलांव दस्तऐवजाचे वितरण व एनआयसी ई पोर्टलवर २७ रोजी नोंदणी खुली करण्यात आली आहे. बोली सादर करण्यासाठी २८ मार्च अंतिम तारीख आहे. बोलीपूर्व बैठक १५ फेब्रुवारी रोजी घेतली जाईल. भूखंडांचा प्रत्यक्ष लिलांव १ ते ५ एप्रिल या कालावधीत होणार आहे. हे भूखंड ग्रुप १०१ व १०२ वगळता अन्न पदार्थ तसेच पेय उत्पादनासाठी दिले जाणार आहेत.
दरम्यान, वेर्णा औद्योगिक वसाहतीत चार भूखंड ई लिलांवाच्या माध्यमातून भाडेतत्त्वावर वितरित केले जातील. यात प्रत्येकी २,००० चौरस मिटरचे दोन, ५,१०० चौरस मिटरचा एक व २७२८ चौरस मिटरचा एक अशा क्षेत्राच्या भूखंडांचा समावेश आहे. बोली सादर करण्याची अंतिम तारीख १६ मार्च असून भूखंडांचा प्रत्यक्ष लिलांव २७ मार्च रोजी होणार आहे.
औद्योगिक विकास महामंडळाने (आयडीसी) अलीकडेच उद्योजकांना मोठा दिलासा देताना औद्योगिक भूखंड वांटप, हस्तांतरण व भाडेपट्टी नियम अधिसूचित केले आहेत. भूखंड हस्तांतरणासाठी पूर्वी शुल्क भरावे लागत होते, ते मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे आयडीसी व उद्योजक यांच्यातील व्यवहार आता सुटसुटीत झालेले आहेत. उद्योजकांना इज ॲाफ डुइंग बिझनेसच्या बाबतीत सरकारने नवे पर्व खुले केले आहे. राज्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये अनेक आजारी उद्योग आहेत. ते ताब्यात घेऊन गुंतवणूक करण्यास नव्या गुंतवणूकदारांना वाव मिळेल. त्यामुळे राज्याच्या आर्थिक व्यवस्थेलाही चालना मिळेल आणि नवीन नोकय्राही निर्माण होतील.
दरम्यान, प्राप्त माहितीनुसार राज्यातील औद्योगिक वसाहतींमधील सुमारे १८ लाख चौरस मीटर जमीन थकबाकी असलेल्या ६०५ आजारी उद्योगांमध्ये अडकली आहे.