लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : भाजपची सदस्यता मोहीम गोव्यात सुसाट चालली असून, सोमवारी सायंकाळी ५ ते ८ या तीन तासांतच राज्यात तब्बल ३१ हजार लोकांनी पक्षाचे सदस्य स्वीकारल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी दिली.
येथील भाजप कार्यालयात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, इतर मंत्री, आमदारांना प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते सदस्यता बहाल करण्यात आली. यावेळी तानावडे म्हणाले की, २५ सप्टेंबरपर्यंत सदस्यता नोंदणीचा पहिला टप्पा व १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर, असा दुसरा टप्पा मिळून दीड महिने ही मोहीम चालणार आहे. मिस्ड कॉल देऊन किंवा पक्षाच्या वेबसाईटवर अथवा 'नमो अॅप'वर जाऊन लोक नोंदणी करू शकतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोमवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सदस्य करून घेतल्यानंतर देशभरात गोव्यात ३१ हजार लोकांनी मिस्ड कॉल दिले. पैकी ९ हजार लोकांची सदस्यता प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. यावेळी पक्षाने पाच लाख सदस्य मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
तानावडे पुढे म्हणाले की, गोव्यात पक्षाने सर्व चाळीसही मतदारसंघांत कार्यशाळा घेतल्या. तसेच १७२८ बुथांवर व्हर्चुअल संवाद साधला. त्यामुळे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजपमध्ये घराणेशाही नाही, सक्रिय कार्यकर्त्याला योग्य दखल घेऊन पदे दिली जातात. या सदस्यता मोहिमेनंतर बूथनिहाय, मतदारसंघनिहाय, जिल्हा, राज्य स्तरावर पक्षांतर्गत निवडणुका होतील.
केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले की, सदस्य ही भाजपची ताकद आहे. १९८६ साली पक्षाचे केवळ ३ हजार सदस्य होते. ही संख्या नंतर चार लाखांवर पोहोचली. नव्या सदस्यता मोहिमेलाही प्रचंड प्रतिसाद मिळणार आहे. याप्रसंगी महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, आमदार दिव्या राणे तसेच इतर आमदार, मंत्री उपस्थित होते.
भाजपची सदस्यता सर्व धर्मीयांना ती खुली आहे. ज्यांना देश सेवा करायची इच्छा आहे, त्यांनी पक्षाची सदस्य स्वीकारावी. भाजपचे अस्तित्व आता केवळ उत्तर भारतापुरतेच मर्यादित राहिलेले नाही तर दक्षिण भारतातही पक्षाने भक्कमपणे पाय रोवले आहेत. केरळमध्येही भाजपने खाते उघडले आहे. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.