लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने काल झालेल्या बैठकीत आणखी सहा उद्योगांना मंजुरी दिली आहे. त्याद्वारे ३१० कोटींची गुंतवणूक येणार असून २,४५० जणांना नोकऱ्या प्राप्त होतील, अशी माहिती उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.
मोपा विमानतळानजीक पुणे येथील ब्रह्माकॉर्प कंपनीकडून थीम पार्क येणार आहे. मदर ओशियन प्रा. लि. कंपनीकडून राज्यात समुद्रात शिंपल्यांचे पीक घेतले जाणार आहे. त्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान वापरले जाईल. या शिवाय ब्ल्यू मॉक डिस्टीलरी, हॉटमिक्सींगमध्ये असलेली बागकिया कन्स्ट्रक्शन्स, इलेक्ट्रीकल वाहन निर्मिती करणारी कराड प्रोजेक्टस अॅण्ड मोटर्स लि., पॅकेजिंग कंपनी हॅवपॅक आदी उद्योगांचा यात समावेश आहे. यातील काही कंपन्यांत विदेशी कंपन्यांचा सहयोग आहे. मंत्री गुदिन्हो म्हणाले की, बिगर प्रदूषणकारी स्वच्छ उद्योगांनाच आम्ही प्राधान्य देत आहोत. उद्योगांकडून अधिकाधिक गुंतवणूक यावी, यासाठी इज ऑफ डुइंग बिझनेसवर भर दिला जात आहे.
दाबोळी ते वेर्णा नवीन उड्डाणपूल
वाहतूकमंत्री या नात्याने बोलताना गुदिन्हो यांनी असे सांगितले की, दाबोळी विमानतळ ते वेर्णा नवीन उड्डाणपूल बांधण्याचा तसेच इतर प्रस्ताव घेऊन येत्या सोमवारी मी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहे. हा उड्डाणपूल झाल्यानंतर येथील वाहतूककोंडी दूर होईल. या कामासाठी ६५० कोटी रुपये लागतील. विमानतळावर पार्किंग समस्या दूर करण्यासाठी मल्टीपार्किंग प्रकल्पही विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील बसस्थानकांचे नूतनीकरण करून अद्ययावत सुविधा उपलब्ध केल्या जातील. २५० नव्या इलेक्ट्रिकल बसगाड्या आणल्या जातील.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"