ऑनलाइन लोकमत
पणजी, दि.15 - गोव्यातील दोन महिलांना अज्ञात भामट्यांनी ऑनलाइन संपर्क साधून ३३ लाख रुपयांना लूटण्याचा प्रकार घडला. या प्रकरणात या महिलांकडून पोलिसांच्या सायबर विभागाकडे गुन्हा नोंदविला आहे.
एक महिला सांतिनेज येथील असून दुसरी महिला किर्लपार दाबाळ येथील आहे. दोघांनाही अनुक्रमे १४.७३ लाख रुपये आणि १८.६२ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचे त्यांनी दिलेल्या वेगवेगळ्या तक्रारीत म्हटले आहे. हा प्रकार ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात घडला आहे. सोशल मिडियावरून संपर्कसाधून नंतर मोठ मोठी आमिषे दाखवून त्या महिलांकडून विविध करांच्या रुपांनी पैसे फेडून घेतले. त्यानंतर आपल्याला फसविले गेले याची कल्पना आल्यामुळे या महिलांकडून पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली.
कोट्यवधी रुपये बक्षीस देण्याची आमिषे दाखवून लोकांना फसविण्याचे प्रकार गोव्यात यापूर्वीही घडले आहेत. १८ लाख रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात गोवा पोलीसांनी दिल्ली येथे जाऊन दोघा नायजेरीयन नागरिकांना पकडून आणले होते आणि अजूनही ते न्यायालयीन कोठडीत आहेत. ते अटकेत असताना हे नवे प्रकार उघडकीस आल्यामुळे या प्रकरणात त्यांचा हात नसल्याचे स्पष्ट होत असून अशा एक पेक्षा अनेक टोळ्या सक्रीय असल्याचेही संकेत मिळत आहेत. या प्रकणाचा पोलीस तपास करत आहेत.