ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 26 - खंडणी बहाद्दर दीपक गडेकरने केलेल्या लुटीतील ३४ हजार रुपये गडेकरचा वर्दीतील साथिदार पोलीस हवालदार केशव नाईक याच्याकडे सापडले. पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकून ही रक्कम जप्त केली.
दीपक गडेकर हा खंडणी उकळण्याची कामे करीत होता तो पोलिसांना हप्ते देऊनच हे सिद्ध करणारा आणखी एक पुरावा या प्रकरणाचा तपास करणाºया क्राईम ब्रँचला मिळाला आहे. नाईक याच्या घरी छापा टाकला असता त्याच्या कडून ही रक्कम जप्त करण्यात आली. गडेकरने दिलेल्या जबानीनंतर ही कारवाई करण्यात आली अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. गडेकर याने आपण आणखी तिघा पोलिसांना हप्ते देत असल्याचे क्राईम ब्रँचला सांगितले आहे. त्यात नीरीक्षक जिवबा दळवी, उपनिरीक्षक विश्वजित चोडणकर आणि कॉन्स्टेबल प्रशांत चोपडेकर यांची नावे आहेत. पैकी चोडणकर व चोपडेकर यांनी आपण त्याच्याकडून पैसे घेतल्याची कबुली दिली आहे. गडेकर त्यांना पैसे देणे लागत होता असे त्यांचे म्हणणे आहे. निरीक्षक दळवी यांनी मात्र आरोप फेटाळले आहेत. या प्रकरणात दोघा पोलिसांना अटक झाली आहे. आणखी कारवाई होण्याचेही संकेत आहेत.
दरम्यान गडेकर व त्यांचे साथिदार आत्माराम मालवणकर, गौतम कोरगावकर आणि प्रितेश आगरवाडेकर यांना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. या तिघांच्या जामीन अर्जांवर मंगळवारी म्हापसा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात सुनावणी होणार आहे.
अहवालच्या प्रतीक्षेत: डीआयजी
या प्रकरणात ज्या पोलीसांचा सहभाग उघडकीस आला त्या दोन पोलिसांना निलंबीत करण्यात आले असले तरी आणखी काही पोलिसांची नावे या प्रकरणात उघड झाल्यामुळे पोलीस खात्याच्या विश्वासहर्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या विषयी बोलताना पोलीस उपमहानिरीक्षक विमल गुप्ता यांनी सांगितले की अद्याप आपल्याला तपास अहवाल मिळालेला नाही. अहवाल मिळाल्यावनंतर त्या नुसार कारवाई केली जाईल असे ते म्हणाले.