पणजी: एटीएममशीनमध्ये घालण्यासाठी नेलेल्या पैशांतील ३५ लाख रुपये स्वत:च हडप करण्याचा प्रकार कॅनरा बँकमधील एका अधिकाऱ्याकडून क रण्यात आला आहे. या प्रकरणात आगशी पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीसांनी हिंद दीप वालिया याला अटक केली आहे.
हा कारनामा करणाऱ्या बँक अधिकाऱ्याचे नाव हिंद दीप वालिया असे असून तो कॅनरा बँकच्या आगशी शाखेत एक अधिकारी आहे. तो मूळचा पंजाब येथील असून बँकमधील नोकरीमुळे तो गोव्यात राहत होता. वास्तविक एटीएममशीनमध्ये पैसे घालण्याची जबाबदारी ही त्याची नव्हती, परंतु त्याला ते काम करण्याची खूप इच्छा होती. ४ मार्च रोजी सकाळी पाउणेदहा वाजण्याच्या सुमारास तो एटीएम मशीनमध्ये पैसे घालण्यासाठी गेला होता. मात्र त्याने जी रोखड नेली होती ती आगशी येथील पूर्ण रक्कम एटीएममध्ये घातलीच नाही.त्यात ३५ लाख रुपये कमी घालण्यात आल्याचे लक्षात आल्यामुळे बँकेच्या स्थानिक शाखेकडून ही माहिती पणजी येथील विभागीय कार्यालयात कळविली. कॅनरा बँकच्या विभागीय शाखेचे सहाय्यक महाव्यवस्थापक आर गणेश यांनी आगशी पोलीस स्थानकात या विषयी तक्रार नोंदविली. पोलिसांनी या प्रकरणात हिंद दीप वालिया याच्या विरुद्ध फसवणुकीचा आणि चोरीचा गुन्हा नोंदविला असून त्याला अटकही करण्यात आली आहे.