पणजी : गोव्यातील ज्या मांगोरहील, वास्को भागात दोन दिवसांपूर्वी सरकारने कंटेनमेन्ट झोन जाहीर केला, तिथे बुधवारी 35 नवे कोरोना रुग्ण आढळले. यामुळे सरकारची आरोग्य यंत्रणा ही चिंतीत झाली आहे.
गोव्यात कोरोनाचा सामाजिक संसर्ग एका विशिष्ट भागापुरता सुरू झाला आहे. दक्षिण गोव्यातील मांगोरहील वास्को हा घनदाट लोकवस्तीचा भाग आहे. तिथे लोकसंख्या दोन हजारच्या आसपास आहे. तिथे एक पोलिस दोन दिवसांपूर्वी कोरोना पाॅझिटीव आढळून आला. त्याचे पाच सदस्यीय कुटुंबही कोरोना पाॅझिटीव आढळून आले. यानंतर 230 व्यक्तींच्या चाचण्या मांगोरहील भागात केल्या गेल्या. एकूण 35 रुग्ण कोरोनाग्रस्त आढळून आल्याने आणखी दोनशे व्यक्तींच्या चाचण्या आज केल्या जातील.
गोवा ग्रीन झोनमध्ये असला तरी येथील स्थिती अचानक बदलली आहे. आणखी काही चाचण्यांचे अहवाल येणे बाकी आहे. गोव्यात रेल्वे सुरू झाली व बसनेही महाराष्ट्रातील रेड झोनमधून लोक येऊ लागले. त्यानंतर येथे कोरोना रुग्ण संख्या वाढू लागली असे काही आमदारांचेही म्हणणे आहे