पणजी : गोव्यात समुद्रकिनाऱ्यावरील खाजगी शॅकसाठी सुमारे ३५0 अर्ज परवान्यासाठी पडून आहेत. पर्यटक हंगाम अर्ध्यावर आला तरी गोवा किनारपट्टी व्यवस्थापन प्रधिकरणाकडून परवाने न मिळाल्याने व्यावसायिकांनी आर्थिक फटका बसला आहे.
प्राधिकरणाचे सदस्य सचिव पराग नगर्सेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यास दुजोरा दिला. काहीजणांचे दस्तऐवज ठीक नाहीत त्यांना योग्य ती कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. अर्जांची छाननी, जागांची प्रत्यक्ष तपासणी आदी कामे मनुष्यबळाच्या अभावामुळे रखडली ती पूर्ण करुन येत्या आठवड्यात परवाने देण्याची प्रक्रिया सुरु होईल, असे नगर्सेकर यांनी सांगितले.
जून-जुलैमध्ये अर्ज स्वीकारण्याचे काम सुरु होते. अनेकांनी तेव्हाच अर्ज केलेले आहेत परंतु त्यांना अजून परवाने मिळू शकलेले नाहीत. ट्रॅव्हल अॅड टूर असोसिएशनचे अध्यक्ष सावियो मेसियस यांच्या म्हणण्यानुसार खाजगी शॅकना वेळेवर परवाने दिले जावेत यासाठी वेगवेगळ्या अधिका-यांची भेट घेतली. तरीही काहीच हालचाली झाल्या नाहीत त्यामुळे वाट पाहून काहीजणांनी शॅक उभारले आणि व्यवसायही सुरु केला. प्राधिकरणाच्या नाकर्तेपणामुळे त्यांना तसे करावे लागले. एका अर्थी सरकारचा यात मोठा महसूलही बुडाल्याचे त्यांनी मान्य केले.
गेली दोन वर्षे सातत्याने खाजगी शॅकना परवाने देण्यास विलंब केला जात आहे. खाजगी शॅकना परवाने देणे पर्यटन खात्याच्या नव्हे तर किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अखत्यारित येत असल्याचा निवाडा राष्ट्रीय हरित लवादाने दिल्यानंतर प्राधिकरणच हे काम पहात आहे. तथापि खाजगी शॅकना परवाने देण्यास मात्र विलंब लावला जात आहे. पर्यटन खाते परवाने देत होते तेव्हा आम्हला कोणतीच समस्या नव्हती, असे मेसियस म्हणाले.
किना-यांच्या क्षमतेचा अभ्यास करण्याचा आदेश लवादाने प्राधिकरणाला दिला होता. गेल्या हंगामात उशिरापर्यंत हा अभ्यास चालू होता त्यामुळे परवान्यांना गत सालीही विलंब झाला होता.
किना-यांवरील शॅक हे देश, विदेशी पर्यटकांचे आकर्षण आहे. शॅकमध्ये मद्य आणि खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक गर्दी करीत असतात. किना-यांवरील काही खाजगी जागेतही शॅक उभारण्यासाठी व्यावसायिक अर्ज करीत असतात. परंतु यावर्षी त्यांच्या नशिबी निराशाच आली आहे.