लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : साळ येथील शापोरा नदीवर ३५० कोटी रुपये खर्चुन तब्बल ७५ लाख क्युबिक मीटर पाणी साठवता येईल अशा मोठ्या बंधाऱ्याचे काम सध्या सुरू आहे. हा बंधारा पूर्ण झाल्यानंतर बार्देश व डिचोली तालुक्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याचा दावा केला जात आहे.
जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांनी ही माहिती दिली. राज्यातील सहा धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याचा दावा करून मान्सून लांबणीवर पडला तरी जून-जुलैपर्यंत पाण्याची समस्या उद्भवणार नाही, असा दावा त्यांनी केला.
संपूर्ण दक्षिण गोव्याला पाणी पुरवणारे साळावली धरण ५२ टक्के भरलेले आहे. सत्तरी, डिचोली व बार्देश तालुक्याला पाणी पुरवणारे आमठाणे धरण ४० टक्के भरलेले आहे. अंजुणे ४६ टक्के, चापोली ६१ टक्के, पंचवाडी ४२ टक्के तर गावणे धरण ५७ टक्के भरलेले आहे. तर तिळारी धरण ९४ टक्के भरलेले आहे.