मडगाव: कोरोना महामारीमुळे शाळा बंद असल्याने ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय पुढे आला असला तरी नेत्रावळी सारख्या ग्रामीण भागात अजूनही मोबाईल नेटवर्क पुरेसे मिळत नसल्याने या भागातील 36 विद्यार्थी या शिक्षणाला 'नॉट रीचेबल' झाले आहेत.
नेत्रावळीचे सामाजिक कार्यकर्ते अमित नाईक यांनी ही वस्तुस्थिती शुक्रवारी शिक्षण संचालक वंदना राव यांच्या निदर्शनास आणून दिली. नेत्रावळी सरकारी शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्ग सुरु केले आहेत, पण या 36 पैकी 34 विद्यार्थ्यांना नेटवर्क मिळत नाही तर दोन विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने त्यांना स्मार्टफोन घेणे परवडत नाही.
नाईक म्हणाले, नेत्रावळीच्या बीएसएनएलच्या टॉवरची रेंज मिळत नाही त्यामुळे ही समस्या निर्माण झाली असून हे जर असेच चालू राहिले तर ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे पडतील अशी भिती शिक्षण संचालकासमोर व्यक्त केली.
या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना नाईक म्हणाले, जर शक्य असेल तर या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय गावातील एका सभागृहात करता येईल का यावर विचार करा असा सल्ला डॉ. राव यांनी दिला आहे. अशी पर्यायी व्यवस्था केल्यास शिक्षण खाते त्यास मान्यता देण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले आहे, असे नाईक यांनी सांगितले. तसेच, ग्रामीण भागातील या समस्याकडे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लक्ष दिले पाहिजे असे नाईक यांनी सांगितले.