लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पर्वरी येथे साडेपाच कि. मी.च्या सहापदरी उड्डाण पुलाचे ३६४.६८ कोटी रुपये खर्चाचे काम राजेंद्र सिंह भांबू इन्फ्रा कंपनीकडे सोपविण्यात येणार आहे. या कामासाठी निविदा काढल्या असता १६ कंपन्यांनी बोली लावली. त्यात वरील कंपनीची निवड झाली आहे. उड्डाण पूल झाल्यानंतर पर्वरीतील वाहतुकीची कोंडी दूर होणार आहे, सार्वजनिक बांधकाममंत्री निलेश काब्राल यांनी ही माहिती दिली.
गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये केंद्र सरकारने गोव्यातील रस्त्यांसाठी २२२८ कोटी रुपये मंजूर केले होते. त्यात ६०० कोटी रुपये पर्वरी येथील या उड्डाणपुलासाठी आहेत. वर्क ऑर्डर काढल्यानंतर २४ महिन्यात ते काम पूर्ण होणे अपेक्षित आहे व पुढील दहा वर्षे देखभाल दुरुस्तीची जबाबदारी कंपनीची असेल.
दरम्यान, २०१८ मध्ये स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात आक्षेप घेतलला होता. उड्डाणपूल ज्या परिसरातून जातो, त्या परिसरात अनेकांच्या घरांसह शाळा तसेच इस्पितळे आहेत. या परिसरातच उड्डाणपुलांचे खांब उभे राहणार आहेत. त्यामुळे त्याचा मोठा फटका स्थानिकांना भोगावा लागू शकतो. त्यामुळे सरकारने तत्काळ पर्वरीतील उड्डाणपुलाबाबत फेरविचार करावा, अशी मागणी केलेली होती. परंतु, तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी त्यावेळी पर्वरी बाजार ते हाऊसिंग बोर्डपर्यंत उड्डाणपूल उभारण्यात येईल. यासाठी सुमारे ३५० कोटींचा खर्च येईल. यात कोणाचीही घरे, मालमत्ता जाणार नाही, असे म्हटले होते. या सहा पदरी उड्डाणपुलाचे स्थानिकांसमोर सादरीकरण करण्यात आलेले आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने झुवारी पुलावरील टॉवर आणि व्ह्यूइंग गॅलरी बांधण्यासाठी निविदा काढली होती. चार कंपन्यांनी बोली लावली. फिरता टॉवर आणि व्ह्यूइंग गॅलरीबरोबरच, आकर्षक रोषणाई व पार्किंग व्यवस्थेचाही समावेश आहे. फिरता टॉवर आणि व्हाइंग गॅलरी गोव्यात पर्यटकांचे मोठे आकर्षण ठरणार आहे.
'झुवारी'वर फिरता टॉवर, गॅलरी
ब्रुवारी नदीवरील आठ पदरी केबल-स्टेड नवीन पुलावर फिरता टॉवर व गॅलरी बांधण्याचे काम दिलीप बिल्डकॉन कंपनीकडेच सोपवले जाणार आहे. या कामासाठी चार कंपन्यांनी बोली लावली होती, त्यात दिलीप बिल्डकॉनची निवड झाली. खासगी सार्वजनिक तत्त्वावर (पीपीपी) बांधकाम होणार असून त्यासाठी अंदाजे ३०० कोटी रुपये खर्च येणार आहे. या झुआरी पुलावरील दुसऱ्या चौपदरी लेनचे काम पूर्ण झाले असून येत्या महिन्यापर्यंत ही लेन खुली करण्यात येण्याची शक्यता आहे