पणजी : गोव्याच्या कदंब महामंडळाने महाराष्ट्रातील महाराष्ट्रात राज्य परिवहन महामंडळाच्या चालक, वाहक कर्मचा-यांना पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर अनुचित घटना घडू नये यासाठी गोव्यातून महाराष्ट्रात जाणा-या गाड्या रद्द केल्या आहेत. ‘कदंब’च्या अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, मुंबई, मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी, कुडाळकडे जाणाºया कदंबच्या ३७ गाड्या रद्द केल्या. महाराष्ट्रात पोचलेल्या गाड्यांनाही परतण्याचे निर्देश दिले आहेत.
दिवाळीच्या पूर्वसंध्येला गाड्या बंद राहिल्याने सणासुदीसाठी गांवी जाणा-यांचे हाल झाले. येथील कदंब स्थानकावर गावी जाणाºया चाकरमान्यांची गर्दी उसळली होती. स्थानकावरील ‘कदंब’ वाहतूक नियंत्रकाशी संपर्क साधला असता सकाळी सावंतवाडीकडे जाणाºया तीन गाड्या पाठवल्या होत्या परंतु पत्रादेवी येथूनच त्या मागे परतल्या. गोव्याच्या हद्दीपर्यंतच गाड्या जात आहेत. वेंगुर्ला, मालवणकडे जाणाºया गाड्या सातार्डा हद्दीवरुन परतल्या. काही गाड्या दोडामार्ग हद्दीवरुन परतल्या, असे सांगण्यात आले.
सोमवारी रात्री वस्तीला आलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्याही सकाळी सुटू शकल्या नाहीत. बेती येथे महामंडळाच्या जागेत एसटी गाड्या उभ्या करुन ठेवल्या होता. एसटीच्या संपामुळे प्रवाशांनी कोकण रेल्वेने प्रवास पसंत केला. सकाळी दिवा पॅसेंजर, मांडवी एक्सप्रेस तसेच दक्षिणेतून येणाºया लांब पल्ल्याच्या रेलगाड्यांनाही करमळी, मडगांव, थिवी आदी रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांनी गर्दी केली होती. खासगी बसभाडे गगनाला!दरम्यान, दिवाळीनिमित्त मुंबई, पुणे, बंगळूरकडे जाणाºया खाजगी बसगाड्यांचे भाडे प्रचंड वाढलेले आहे. मुंबईला जाण्यासाठी एरव्ही स्लीपर कोचचे तिकीट ६५0 रुपये असते ते आज १२00 रुपयांपर्यंत पोचल्याचे टूर आॅपरेटर्सकडे संपर्क साधला असता आढळून आले. पुणे, बंगळूरकडे जाणा-या बसगाड्यांचे दरही वाढलेले आहेत. तुलनेत विमानभाडे कमी आहे. एअर इंडियाचे गोवा-मुंबई भाडे मंगळवारी २६५४ रुपये इतके होते. एका बस व्यावसायिकाने दिलेल्या माहितीनुसार सध्या पर्यटकांची गर्दी तशी कमी आहे परंतु दिवाळीसाठी मुंबई, पुण्यात फिरण्यासाठी जाणा-या गोवेकरांची संख्या जास्त आहे. बसगाड्या आधीच फुल्ल आहेत.