पणजी: गोवा ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी पूर्णपणे सज्ज आहे. आतापर्यंत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे लोगो आणि मास्कॉट लाँच बऱ्यापैकी करण्यात आले आहे, आणि आता मशाल, आणि थिम साँग लाँच करून स्पर्धेबाबत एक चांगले वातावरण तयार केले आहे, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.
क्रीडा खात्यातर्फे शुक्रवारी ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे मशाल, थिम साँग आणि स्पर्धेच्या वेबसाईटचे लॉन्चिंग करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यपाल पी. एस श्रीधरन पिल्लई, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, क्रीडामंत्री गोविंद गावडे, मंत्री निलेश काब्राल, आमदार रुडोल्फ फर्नांडिस, भारतीय ऑलम्पिक संघटनेचे अमिताभ शर्मा, क्रीडा खात्याच्या सचिव स्वेतिका सच्चेन, संचालक डॉ. गीता नागवेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
येत्या २५ ऑक्टबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत काळात आम्ही राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करत आहोत, हे आमच्यासाठी अभिमानस्पद आहे. स्पर्धेची मशाल आता राज्यातील प्रत्येक ठिकाणी जाणार आहे, जिथे स्पर्धा होणार आहे, गोमंतकीयांनी या संधीचा लाभ घेत या स्पर्धेत आपला हातभार लावावा. क्रीडा संघटनेनीं आता जोरात तयारीला लागावे, व पदके प्राप्त करून देण्यावर भर द्यावा, असे डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.
क्रीडा स्पर्धेची ही मशाल पेटवून स्पर्धेचा आगाज आम्ही केला आहे. ही मशाल जेव्हा राज्यभर फिरेल तेव्हा उर्जात्मक वातावरण तयार होईल. राज्याबाहेर देखील ही मशाल फिरणार आहे. एकूण २८ राज्य या क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार आहे, तसेच ४३ खेळांचा यंदा या स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. स्पर्धा सफल करणे हे एका मुख्यमंत्री किंवा क्रीडामंत्रीचे काम नाही तर सर्वांनी एकत्रित येऊन ही स्पर्धा सफल केले पाहिजे, आणि मला पूर्ण खात्री आहे की आम्ही सर्वजण मिळून ही स्पर्धा सफल करू, असे मत क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी मांडले.
यावेळी राज्यपाल पी. एस श्रीधरन पिल्लई यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या, व पदके मिळवून देण्याचे आवाहन केले. क्रीडा खात्याच्या संचालिका डॉ. गीता नागवेकर यांनी आभार मानले.
सर्व संघटनेंचा पाठिंबा, पण उपस्थिती नाही (चौकट करणे) स्पर्धेच्या तयारीसाठी सरकाने निधी न दिल्यामुळे राज्यातील बहुतांश क्रीडा संघटनेनी मशाल आणि थिम साँग लाँचवर बहिष्कार घालण्याचे गुरुवारी ठरविले होते, परंतु शुक्रवारी अनेक संघटनेच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर बहिष्कार टाकण्याचा निर्णय बदलण्यात आला होता, असे असूनही अनेक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित नव्हते.