पंकज शेट्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को: दाबोळी विमानतळावर प्रवाशांना सोडण्यासाठी व नेण्यासाठी दररोज सरासरी तीन हजार वाहने येतात. गेल्या पाच महिन्यांत केवळ विमानतळ परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन केलेल्या ७,३४४ जणांना दाबोळी विमानतळ वाहतूक पोलिसांनी कारवाई करत ३८ लाख ७३ हजारांची रक्कम वसूल केली आहे.
दाबोळी विमानतळावर दररोज हजारे प्रवासी ये-जा करतात. या प्रवाशांना ने- आण करण्यासाठी जवळपास तीन हजार वाहने विमानतळावर येतात. विमानतळाचे पोलिस निरीक्षक राहुल धामशेकर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील वाहतूक व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यात येत आहे. जानेवारी ते ३ जूनपर्यंत अशा पाच महिन्यांत विमानतळ टर्मिनल इमारतीबाहेर आलेल्या वाहनचालकांपैकी ७३४४ जणांना विविध वाहतूक कायद्यांचे उल्लंघन केल्याने लाखोंचा दंड ठोठावला आहे.
३३०० वाहनचालकांना नो-पार्किंगच्या जागेत वाहने पार्क केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच काहींनी वाहन चालवताना सीट बेल्ट न लावणे, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे, विनाहेल्मेट दुचाकीस्वार यांना दंड ठोठावला आहे. वाहतूक कायद्याचे उल्लंघन केल्याने दंड देण्यात आलेल्या वाहनचालकांमध्ये खासगी, रेंट अ केब, ट्यूरिस्ट टॅक्सींचा समावेश आहे.
तगडा बंदोबस्त
दाबोळी विमानतळ वाहतूक पोलिस स्थानकावर पोलिस निरीक्षक राहुल धामशेकर यांच्यासह १ पोलिस उपनिरीक्षक, ३ सहाय्यक उपनिरीक्षक, ३ महिला पोलिस सहाय्यक उपनिरीक्षक, ६ हवालदार आणि १ पोलिस शिपाई असा १५ जणांचा ताफा असून यांचा कडक पहारा आहे.