वास्को: बुधवारी (दि.२३) संध्याकाळी वेर्णा महामार्गावर संरक्षण दलाचा ट्रक व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात ३९ वर्षीय दुचाकी चालक तरुण अनिल रामचंद्र नाईक याचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक अनिल याला उपचारासाठी घेऊन मडगाव येथील इस्पितळात गेला, मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे कळाल्यानंतर ट्रकचालक तेथून निघून गेल्याची माहिती वेर्णा पोलिसांकडून प्राप्त झाली. या अपघात प्रकरणातील ट्रक चालकाचा वेर्णा पोलीस बुधवारी उशिरा रात्री शोध घेत होते.
वेर्णा पोलीस स्थानकाच्या उपनिरीक्षक रियंका नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी संध्याकाळी ४.१५च्या सुमारास हा अपघात घडला. बोगदा, मुरगाव येथे राहणारा अनिल नाईक हा तरुण विविध सामग्री लोकांच्या घरी पोहोचवण्याच्या एका कंपनीत कामाला आहे. संध्याकाळी तो आपल्या दुचाकीवरून वेर्णा महामार्गावरून जात होता. ‘बिट्स पिलानी केंप्स’ च्या बाहेर असलेल्या महामार्गाच्या रस्त्यावर तो पोहोचला असता येथे त्याच्या दुचाकीची धडक तेथून जाणा-या संरक्षण दलाच्या ट्रक वर बसली. या अपघातात अनिल व त्याची दुचाकी ट्रक खाली गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.अपघातात जखमी झालेल्या अनिलला उपचारासाठी ट्रक चालक मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात घेऊन गेला, मात्र इस्पितळात आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. यानंतर या अपघात प्रकरणातील ट्रक चालक तेथून निघून गेल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक रियंका नाईक यांनी देऊन त्याला शोधण्याचे काम चालू असल्याची माहिती बुधवारी उशिरा रात्री दिली. अपघातग्रस्त झालेली दुचाकी घटनास्थळावरच टाकून जखमी अनिलला उपचारासाठी ट्रक चालक इस्पितळात घेऊन गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. यानंतर वेर्णा पोलिसांनी अपघातस्थळावरून सदर दुचाकी आणून पोलीस स्थानकाबाहेर ठेवली. वेर्णा पोलीस सदर अपघात प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.