पणजी: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआय गोवा विभागाच्या अधिकाय्रांनी अबुधाबीहून आलेल्या तीन प्रवाशांची झडती घेत ५.७ किलो तस्करीचे सोने व २९ प्रो मॅक्स मोबाइल मिळून ३.९२ कोटी रुपये किमतीचा ऐवज हस्तगत केला. या प्रकरणी तिघांनाही अटक करण्यात आली आहे.
मोपा विमानतळ गेल्या ११ डिसेंबर रोजी खुला करण्यात आला त्यानंतर या विमानतळावर झालेली तस्करीची ही पहिलीच मोठी कारवाई आहे. दुबईहून आलेल्या तिन्ही प्रवाशानी पेस्टच्या स्वरुपात सोने आणले होते. परंतु महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) चाणाक्ष अधिकाय्रांच्या नजरेतून ही तस्करी सुटली नाही. गुजरात बाला पटेल ऊर्फ मोहम्मद गुलाम नबी (३७., रा. गुजरात), कामरान अहमद खान (३८, रा. मुंबई) व इरफान (३०, रा. उत्तर प्रदेश) अशी अटकेतील तिघांची नावे आहेत.
तीन वर्षात ३६ प्रकरणे नोंद ; ३० किलो तस्करीचे सोने जप्तदरम्यान, यापूर्वी गोव्याच्या दाबोळी विमानतळावर अधूनमधून तस्करीचे सोने पकडले जाण्याच्या घटना घडत होत्या. प्राप्त माहितीनुसार गेल्या तीन वर्षांच्या काळात गोव्यात सोन्याच्या तस्करीचे ३६ गुन्हे नोंद झाले आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये मिळून ३० किलो तस्करीचे सोने जप्त करण्यात आले.देशभरातील चित्र असे आहे की, २०२० नंतर आतापर्यंत देशात ८७५ सोने तस्करीची प्रकरणे नोंद झाली. हा आलेख वाढताच आहे. कोविड महामारीच्या काळात आंतरराष्ट्रीय विमाने बंद होती. त्यामुळे सोने तस्करीची प्रकरणे झाली.
२०२१ साली गोव्यात सोने तस्करीची १३ प्रकरणे घडली व १२.२२ किलो सोने जप्त करण्यात आले. २०२२ साली १५ प्रकरणे घडली व ८.९ किलो सोने जप्त केले. २०२० साली ७ प्रकरणे घडली व ७.७४ किलो सोने जप्त केले.