लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : राज्यात चरावणेसह अन्य तीन धरणे बांधण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. तर वर्षभरात १०० हून अधिक बंधारे बांधले जातील, अशी माहिती जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी विधानसभेत दिली.
सत्तरीतील ठाणे पंचायत क्षेत्रातील चरावणे येथे म्हादई अभयारण्याच्या क्षेत्रात धरण उभारण्याच्या प्रस्तावाला मुख्य वनपालांनी परवानगी दिल्यामुळे चालू वर्षातच या धरणांच्या बांधकामासाठी पायाभरणी केली जाईल, असे जलस्रोतमंत्र्यांनी सांगितले. आमदार वेंझी व्हिएश यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जलस्रोतमंत्र्यांनी ही माहिती दिली.
जलस्रोत खात्याने चरावणे धरणाचा प्रस्ताव वन्यजीव मंडळाला पाठवला होता. त्याला मंडळाने मान्यता दिली असल्यामुळे धरणाच्या कामाची प्रत्यक्ष सुरुवात करण्यास सरकार मोकळे झाले आहे. डिसेंबरअखेर या कामाची सुरूवात होईल, असेही मंत्र्यांनी सांगितले.
धरणे भरली
राज्यातील अंजुणे धरणाचा अपवाद वगळल्यास बहुतेक सर्व धरणे ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहेत. धरणे भरली की अधिकाधिक पाणी साठवून ठेवण्याची व्यवस्था केली जाईल, असेही मंत्र्यांनी सांगितले. पंचवाडी धरण पूर्ण भरले असून साळावलीही जवळजवळ पूर्ण उंची गाठण्याच्या मार्गावर आहे.