वास्को: मुंबईहून गोव्याच्या दाबोळी विमानतळावर उतरलेला एक प्रवासी ४ लाख ८५ हजार ८०० रुपये असलेली बॅग विसरून गेल्याचे तेथे तैनात केंद्रीय सुरक्षा औद्योगिक दलाच्या (सीआयएसफ) जवानाला दिसून येताच त्याप्रवाशाचा शोध लावून नंतर पैशासहीत ती बॅग त्यांच्या स्वाधीन केली. पैशासहीत सापडलेली ती बॅग नामावंत गायिका तथा अभिनेत्री खुशबू ग्रेवाल यांची असल्याची माहीती दाबोळी विमानतळावरील केंद्रीय सुरक्षा औद्योगिक दलाच्या जवानांना मिळताच त्यांनी तिला पुन्हा दाबोळी विमानतळावर बोलवून पैशासहीत असलेली बॅग त्यांच्या हवाले केली.
दाबोळी विमानतळावरील केंद्रीय सुरक्षा औद्योगिक दलातील विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार शुक्रवारी (दि.४) दुपारी २ च्या सुमारा हा प्रकार उघडकीस आला. दाबोळी विमानतळावर उतरणाºया प्रवाशांच्या आत येणाºया कक्षात असलेल्या बेल्ट २ व ३ समोर एक बेवारस बॅग पडलेली असल्याचे येथे ड्युटीवर असलेले दलाचे कर्मचारी आर. प्रधान यांच्या नजरेस येताच त्यांनी याबाबत वरिष्ठ अधिकाºयांना माहीती दिली. बेवारस सापडलेल्या या बॅगेची केंद्रीय सुरक्षा औद्योगिक दलाच्या ‘बोंम्ब निकामी पथकाने’ तपासणी केली असता कुठल्याच प्रकारचा धोका नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ही बॅग उघडून आत काय आहे याची तपासणी करण्यात आली.
सदर बॅग उघडण्यात आली तेव्हा त्याच्या आत ४ लाख ८० हजार ८०० रुपये रोख रक्कम असल्याचे स्पष्ट झाले. दाबोळीवर एवढी मोठी रक्कम कोण विसरून गेला याबाबत दलाच्या जवानांनी सीसीटीव्ही कॅमेरा च्या मदतीने चौकशी करण्यास सुरवात केली तेव्हा ती बॅग मुंबईमधून गोव्यात आलेल्या एक प्रवाशाची असल्याचे त्यांच्यासमोर उघड झाले. बॅग नामावंत गायिका तसेच अभिनेत्री खुशबू ग्रेवाल यांची असल्याची माहीती दलाच्या विश्वसनीय सूत्रांनी देऊन नंतर त्यांना संपर्क करून पुन्हा दाबोळी विमानतळावर बोलवण्यात आले. यानंतर येथे योग्य सोपस्कार केल्यानंतर पैशासहीत असलेली बॅग त्यांच्या हवाले केल्याची माहीती दलाच्या सूत्रांकडून प्राप्त झाली.