पणजी : ओशेल-शिवोली येथे रसायनांचा वापर करून कृत्रिमरीत्या पिकविलेले सुमारे ४ टन आंबे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून जप्त केले. या आंब्यांची किंमत अंदाजे ५ लाख रुपये असून जप्तीनंतर सर्व आंबे म्हापसा येथील पठारावर नष्ट करण्यात आले. ओशेल-शिवोली येथील सुशांत बाणावलीकर याच्या घरात ही कारवाई करण्यात आली. इथोफेन व इथेरियल ही रसायने वापरून हे आंबे कृत्रिमरीत्या पिकविले जात होते. या रसायनांच्या बाटल्याही घराच्या मागील बाजूस जप्त करण्यात आल्या आहेत. प्लास्टिक बादल्या, टब आदी साहित्य तसेच रसायनांच्या बाटल्या, ट्यूब्सही घटनास्थळी सापडल्या आहेत. एफडीएचे विशेष पथक या कारवाईसाठी गेले होते, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन खात्याचे संचालक सलीम वेलजी यांनी दिली. आंब्यांचे नमुने घेण्यात आले आणि त्यांची तपासणी बांबोळी येथील प्रयोगशाळेत करण्यात आली. त्यात रसायनांचा वापर झाल्याचे स्पष्ट झाले. बाणावलीकर यानेही आपण रसायने वापरल्याची कबुली दिली. काही तास उलटल्यानंतर रसायनांचा वापर शोधून काढणे कठीण बनते. त्यामुळे शक्य तितक्या लवकर प्रयोगशाळेत तपासणी करून रसायनांचा वापर शोधून काढावा लागतो.
५ लाखांचे ४ टन आंबे ‘एफडीए’कडून नष्ट
By admin | Published: May 07, 2016 2:50 AM