अप्पा बुवा / फोंडा- मंगळवारी येथील आचल टेक्सटाईल या दुकानाला लागलेल्या आगीत दुकानातील सर्व सामान बेचिराख झाले असून अग्निशामक दलाचे अधिकारी सुशील मोरजकर यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार किमान 40 लाखाचे नुकसान झाले आहे. योग्य ते मूल्यमापन झाल्यानंतर निश्चित नुकसान कळून येईल.
मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान आगीवर संपूर्णपणे नियंत्रण ठेवण्यात अग्निशामक दलाला यश आले. सदरची आग विझविण्यासाठी एकूण पाच पाण्याचे बंब वापरण्यात आले आहेत. आगीत भस्मसात झालेल्या दुकानाच्या वर असलेले आणखीन एक कपड्याचे दुकान, त्याचबरोबर हॉटेल मिनिनोला सुद्धा या आगीची झळ पोचलेली आहे. आगीचे परिणाम त्यांच्या भिंतीवर स्पष्टपणे जाणवत आहेत. आग लागल्यानंतर पहिल्या मजल्यावरील कापड दुकानदाराने वेळीच दुकान बंद केल्याने पुढील अनर्थ टाळता आला.
अग्नीरोधक यंत्र का नाही?कोणत्याही दुकानाला परवानगी देताना किंवा व्यवसायिक आस्थापनाला परवानगी देताना किमान काही अग्निरोधक सामग्री असणे गरजेचे असते. आज ज्यावेळी अग्निशामक दलाचे अधिकारी सुशील मोरजकर यांच्याबरोबर दुकानाची पाहणी केली असता कुठेच अग्निरोधक सामग्री आढळून आली नाही. मात्र इमारतीच्या मागच्या बाजूला आग्निरोधक दोन सिलेंडर बसवण्यात आलेले आढळले. दुकान पुढे असताना दुकानाच्या मागे अग्नारोधक सिलेंडर कशाला असा प्रश्न आता निर्माण होत आहे.
युवकांनी केली मदत दुकानाला आग लागली तेव्हा आत मोठ्या प्रमाणावर नवीन कपड्या चा स्टॉक होता. आग रौद्र रुप धारण करत असल्याचे लक्षात येताच स्थानिक युवकांनी पुढाकार घेतला व काही सामान व माल वाचवणे ह्या संदर्भात चांगली कामगिरी बजावली. जे काही कपडे काढता येईल ते काढण्यासाठी युवकांनी यावेळी चांगलीच मदत केली.