पणजी : महाराष्ट्रातील सांगलीत प्रथमच महापौर व उपमहापौर भाजपाचा होणार आहे. भाजपचे एकूण 42 उमेदवार निवडून आले आहेत. महापौर व उपमहापौर निवडीपूर्वी नगरसेवकांमध्ये फूट पडू नये म्हणून सर्व 42 नगरसेवकांना गोव्यात आणून ठेवले गेले आहे. यापैकी अनेक नगरसेवक सहकुटूंब व काही प्रमुख भाजपा कार्यकर्त्यांसोबत गोव्यात आहेत.
सांगलीतील सर्व भाजपा नगरसेवकांना एकत्र ठेवण्यासाठी गोव्यात पाठविणे योग्य ठरेल असा विचार भाजपच्या महाराष्ट्रातील काही नेत्यांनी केला. त्यानंतर या नगरसेवरकांनी सहकुटूंब गोव्यात येणे पसंत केले. गोव्यातील हॉटेलमध्ये गेले दोन दिवस सर्व नगरसेवक आहेत. त्यांनी शुक्रवारी भाजपच्या पणजीतील कार्यालयाला भेट दिली. तिथे त्यांनी दूरचित्रवाहिन्यांवर स्व. अटलबिहारी वाजपेयींच्या अंत्यसंस्काराचे वृत्त पाहिले. त्यानंतर भाजपच्या कार्यालयात या सर्व नगरसेवकांनी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली. गोवा भाजपचे सरचिटणीस सदानंद शेट तानावडे व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सोमवारी महापौर व उपमहापौर निवड आहे. त्यामुळे रविवारी हे सगळे नगरसेवक गोव्याचा निरोप घेतील. गोव्यात त्यांना सुरक्षितस्थळी ठेवले गेले आहे. गोव्यात सध्या पाऊसही हवा तेवढाच पडत असून हे नगरसेवक सहकुटूंब येथील समुद्रकिना-यांसह अन्य पर्यटन स्थळांचा आस्वाद घेत आहेत. जीवाचा गोवा म्हणजे काय असते याचा अनुभवही काही नगरसेवकांना येत आहे. महापौर व उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरले गेले आहेत. आता हे सगळे नगरसेवक थेट मतदानासाठीच पोहचतील.