वास्को: दाबोळी विमानतळावर ‘ओमान एअर’ विमानातून आलेल्या एका आंतरराष्ट्रीय प्रवाशावर कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्याची कसून तपासणी केली असता त्याच्या बॅगेतून त्यांना ४५० ग्राम तस्करीचे सोने आढळले. त्या आंतरराष्ट्रीय प्रवाशाच्या बॅगेमधून सापडलेले तस्करीचे सोने पावडर करून आणल्याचे तपासणीच्या वेळी उघड झाले असून, सदर सोने नंतर जप्त करण्यात आलेले असल्याची माहिती गोवा कस्टम विभागाचे कमिश्नर आर. मनोहर यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली.गुरुवारी (१५) कस्टम विभागाने सदर कारवाई करून तस्करीद्वारे आणलेले ४५० ग्राम सोने दाबोळी विमानतळावर जप्त केले. येथे आलेल्या ‘ओमान एअर’ विमानातील (डब्ल्यू-व्हाय-०२०२) एका आंतरराष्ट्रीय प्रवाशावर कस्टम अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्याला बाजूत घेऊन येथे त्याची कसून तपासणी करण्यात आली. ह्या तपासणीच्या वेळी त्याच्या हातात असलेल्या बॅगेत सहा तपकिरी रंगाची पाकीटे असल्याचे कस्टम अधिका-यांना प्रथम दिसून आले. ह्या पाकीटांची तपासणी केली असता त्याच्या आत सहा छोट्या प्लास्टिक पाकिटात सोनेरी रंगाचा पावडर असल्याचे कस्टम विभागाला दिसून येताच याची तपासणी केली असता सदर पावडर सोने असल्याचे निष्पन्न झाले.सदर तस्करीचे सोने ४५० ग्राम वजनाचे असून त्याची रक्कम केवढी होत आहे याबाबत तपासणी चालू असल्याची माहीती कस्टम विभागाने दिली असली तरी भारतीय बाजार भावानुसार सदर सोन्याची किंमत एकंदरीत १३ लाख ९० हजार रुपयांच्या आसपास असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तस्करी करून आणण्यात आलेले सदर सोने कस्टम अधिका-यांनी १९६२ च्या कस्टम कायद्याखाली जप्त केले आहे. गोव्याच्या दाबोळी विमानतळावर हे सोने उतरविल्यानंतर ते कुठे नेण्यात येणार होते याबाबतही कस्टम अधिकारी सध्या तपास करीत आहेत.
दाबोळी विमानतळावर ४५० ग्राम तस्करीचे सोने जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 3:00 PM