लोकमत न्यूज नेटवर्क, वाळपई : शिवोली येथील एस. एफ. एक्स. उच्च माध्य. विद्यालयातील अकरावी व बारावीचे ४७ विद्यार्थी व शिक्षक काल, सोमवारी चरावणे धबधब्यावर आले होती. संध्याकाळी सत्तरीत जोरदार पाऊस पडल्याने पाण्याची पातळी अचानक वाढल्याने सर्वजण अडकून पडले. याबाबत माहिती मिळताच वाळपई अग्निशमन दलाने तातडीने धाव घेत जाऊन सर्वांना सुरक्षित बाहेर काढले.
सत्तरीत काल दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. तसेच चोर्ला घाटातही मुसळधार वृष्टी झाल्याने चरावणे धबधब्यावर पाण्याची पातळी वाढली. सर्व विद्यार्थी धबधब्याच्या दुसऱ्या बाजूला असल्याने ते अडकून पडले. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मदत केली. मागील महिन्यात पाली धबधब्यावर विद्यार्थी अडकून पडले होते. यात काही विद्यार्थी जखमी होण्याची घटनाही घटना घडली होती. त्यामुळे सत्तरीतील धबधब्यावर सुरक्षेच्या दुष्टीने प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
अग्निशमन दलाच्या पथकामध्ये संतोष गावस यांच्या मार्गदर्शनाखाली अरविंद देसाई, अशोक नाईक, सोमनाथ गावकर, चारुदत्त पळ, कालिदास गावकर, दत्ताराम देसाई, संदीप गावकर, रुपेश गावकर, प्रदीप गावकर, रामा नाईक यांनी बचाव कार्य केले.