लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भाजपची गोव्यातील सदस्य नोंदणी मोहीम आता आणखी पंधरा दिवसांनी वाढवण्यात आली आहे. सत्तरी तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ४८ हजार सदस्य नोंद झाले. डिचोली तालुक्यात ३९ हजार ७१४ लोकांनी भाजपचे सदस्यत्व घेतले. बार्देशात ४२ हजार तर तिसवाडीत ३९ हजार लोकांनी भाजपचे सदस्य होणे पसंत केले. पेडणे तालुक्यात मात्र कमी प्रतिसाद मिळाला.
येत्या दि. १५ नोव्हेंबरपर्यंत भाजपच्या सदस्य नोंदणी मोहिमेची मुदत आता वाढवण्यात आली आहे. वाळपई मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे २४ हजार ४२७ सदस्य भाजप कार्यकर्त्यांनी नोंद केले. पर्ये मतदारसंघात २३ हजार ६५२ सदस्य नोंद केले गेले. सत्तरी तालुक्यानंतर डिचोली तालुक्याचा क्रमांक लागतो. तिथे ४० हजार सदस्य नोंद केले गेले. बार्देशात ४२ हजार ३४९ सदस्य नोंदविले गेले, पण बार्देशात एकूण विधानसभा मतदारसंघ सात आहेत. त्यापैकी पर्वरी, म्हापशात वगैरे मोठ्या प्रमाणात सदस्य झाले. शिवोलीत वगैरे झाले नाहीत. पेडणे मतदारसंघात भाजपच्या वाट्याला मोठी निराशाच आली आहे. तिथे फक्त ४ हजार ६९० सदस्य भाजपला मिळाले. या उलट जिथे खिस्ती व मुस्लीम लोकसंख्या आहे, तिथे तरी जास्त मिळाले आहेत. ताळगावमध्ये १० हजार ३१५ सदस्य नोंद झाले.
दरम्यान, सत्तरी तालुक्यात आमच्या कार्यकर्त्यांनी खूप घाम गाळला. त्यामुळे विक्रमी संख्येने सदस्य नोंद झाले. आमचे काम सुरूच राहील, आपण कार्यकत्यांचे खूप आभार मानतो, असे मंत्री विश्वजीत राणे म्हणाले.
पणजीत १४ हजार
पणजीत १४ हजार १९८ सदस्यांची नोंदणी झाली. डिचोली मतदारसंघात १० हजार १८० तर साखळी मतदारसंघात १७ हजार ४१९ सदस्य नोंद झाले. मयेत आता संख्या वाढली व १२ हजार ११५ झाली. त्या तुलनेत डिचोली मतदारसंघ थोडा मागे पडला. सांगे मतदारसंघात भाजपचे मंत्री असले तरी, तिथे ८ हजार ६८५ सदस्य भाजपला मिळाले. केपेत भाजपचा आमदार नाही, पण तिथे ८,८८२ सदस्य नोंद झाले.