पणजी : पेट्रोल व डिझेलचे दर वाढत गेल्यामुळे या दोन्ही इंधनांच्या विक्रीतून गोव्याला साधारणत: पाच कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल प्राप्त झालेला आहे. पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धीत कर (व्हॅट) कमी करण्याविषयीची सूचना अजून गोवा सरकारकडून येथील वाणिज्य कर खात्याला आलेली नाही.
गोवा सरकारला पेट्रोल व डिझेलच्या विक्रीतून दरमहा सरासरी 80 ते 100 कोटी रुपयांचा मूल्यवर्धीत कर प्राप्त होतो. वार्षिक सुमारे 1 हजार 100 कोटी रुपयांचा महसूल सरकारला मिळत असतो. गेले वर्षभर वारंवार पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाल्यामुळे साधारणत: 5 कोटी रुपयांची महसूलात वाढ झालेली आहे. वाणिज्य कर आयुक्त श्री. बांदेकर म्हणाले, की गोव्यातील पेट्रोल व डिझेलवरील व्हॅट हा देशात सर्वात कमी आहे. अंदमाननंतर गोव्यात पेट्रोल व डिझेल हे सर्वात कमी दराने विकले जाते. जी थोडी वाढ दरांमध्ये अलिकडे झाली त्यामुळे साधारणत: 4-5 कोटींचा अतिरिक्त महसूल सरकारी तिजोरीत आलेला असेल.
पेट्रोलवर सध्या 17 टक्के व्हॅट आहे. पूर्वी हे प्रमाण 15 टक्के होते. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात 17 टक्के प्रमाण केले गेले व त्यामुळे पेट्रोल 64 रुपये लिटर झाले होते. आता पेट्रोल साधारणत: 77 रुपये 33पैसे प्रतिलिटर दराने गोव्यात विकले जात आहे. वर्षभरात 13-14 रुपयांनी पेट्रोल महागले आहे. तरीही देशातील अन्य भागांप्रमाणो हे प्रमाण गोव्यात कमीच आहे. गोव्यात डिझेलवर 19 टक्के व्हॅट आकारला जातो. 2012 साली राज्यात मनोहर र्पीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकार अधिकारावर आल्यानंतर पेट्रोलवरील व्हॅट जवळजवळ काढून टाकला गेला होता. नंतरच्या कालावधीत तो हळूहळू वाढवत नेला गेला.