लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडला 'सिटी इन्व्हेस्टमेंट टू इनोव्हेट इंटिग्रेट अँड सस्टेन उपक्रम २.०' कार्यक्रमांतर्गत ५ कोटी रुपये अनुदान पुरस्काराच्या स्वरूपात जाहीर झाले आहे.
देशभरात शाश्वत शहरी विकास वाढविण्यासाठी केंद्र सरकारच्या पुढाकाराचा हा एक भाग आहे. या अनुदानाचा उपयोग राजधानी शहरात सध्या सुरू असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पांना मदत करण्यासाठी केला जाईल. एकात्मिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प, राज्य स्तरावर हवामानाभिमुख सुधारणा कृती आणि राष्ट्रीय स्तरावर संस्थात्मक बळकटीकरण, तसेच अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आर्थिक व तांत्रिक साहाय्य या माध्यमातून दिले जाते.
पहिल्या घटकामध्ये शहरांसाठी राज्य हवामान केंद्र स्थापन करणे समाविष्ट आहे, जे हवामानाशी संबंधित केंद्रिकृत केंद्र म्हणून काम करेल. दुसरा घटक पर्यावरणीय डेटाचे सर्वसमावेशक निरीक्षण आणि विश्लेषण करण्यासाठी राज्य व शहरस्तरीय हवामान वेधशाळा स्थापन करण्यावर लक्ष केंद्रित करतो. तिसरा घटक शाश्वत शहरी विकासासाठी माहितीपूर्ण निर्णयक्षमता सुनिश्चित करण्यासाठी डेटा आधारित नियोजन आणि अंमलबजावणी सक्षम करण्यावर भर देतो, तर चौथा घटक घनकचरा व्यवस्थापन, पाणी व स्वच्छता, पर्यावरण, शहरी वनीकरण, गतिशीलता आणि वित्त यांसारख्या विविध विभागांमधील सरकारी अधिकाऱ्यांसाठी क्षमता निर्माण करण्यासाठी समर्पित आहे.
शहर मॉडेल बनविण्यास प्रोत्साहन
इमॅजिन्स पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीत रॉड्रिग्स म्हणाले की, 'शहरी शाश्वतता आणि नावीन्यपूर्णतेच्या बाबतीत पणजीला एक मॉडेल शहर बनविण्याच्या आमच्या ध्येयातील हे एक मोठे पाऊल आहे.'