ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 26 - इंडोनेशियामध्ये तयार झालेल्या ‘गुदांग गरम’ नामक एकूण 50 लाख 40 हजार रुपये किमतीच्या आंतरराष्ट्रीय सिगारेट्स गोव्यात जप्त करण्यात आल्या आहेत.
23 मे रोजी केंद्र सरकारच्या रेव्हेन्यू इंटेलिजन्स खात्याकडून ही कारवाई केल्याचे या खात्याच्या गोवा विभागाचे साहाय्यक संचालक लेक्टर मास्कारेन्हस यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले.
दोघा प्रवाशांच्या बॅगा सडा- मुरगाव येथील बॅगेज सेंटरमध्ये आल्या होत्या. दोघे प्रवासी दुबईला शॉर्ट ट्रिपसाठी गेले व तिथून परत आले. ते सिगारेट्सच्या तस्करीसाठी गेले होते, अशी शक्यता रेव्हेन्यू इंटेलिजन्स खात्याने व्यक्त केली आहे.
या प्रवाशांच्या बॅगा तेवढ्या सडा येथे सापडल्या. त्यात आंतरराष्ट्रीय सिगारेट्सच्या दोन हजार 100 काटरुन्स होत्या, असे मास्कारेन्हस यांनी पत्रकात म्हटले आहे. हा माल जप्त केला असून चौकशी सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
गोव्यातील दाबोळी विमानतळावर अलीकडे वारंवार मोठ्या प्रमाणात सोने सीमाशुल्क खात्याकडून पकडले आहे. दुबईमार्गे गोव्यात सोन्याची तस्करी केली जाते, हे स्पष्ट झाले आहे. पण, लाखो रुपयांच्या सिगरेट्स जप्त करण्याची घटना अलीकडील काळात गोव्यात प्रथमच घडली.