पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ६ फेब्रुवारी रोजी मडगाव येथे होणार असलेल्या जाहीर सभेला ५० हजार लोकांची उपस्थिती लाभणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. गोवा भेटीवर आलेले भाजपचे निवडणूक प्रभारी आशिष सूद यांनी येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस सभागृहात भाजप आमदार, मंत्री, मंडल अध्यक्ष, प्रमुख कार्यकर्ते यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी वरील माहिती दिली.
दरम्यान, मोदींच्या सभेला जास्तीत जास्त लोक यावेत यासाठी प्रयत्न चालू आहेत. सूद यांनी भाजप मंडल अध्यक्षांकडून ते किती लोक सभेला आणू शकतील, याचा अंदाज घेतला. मिळालेल्या माहितीनुसार मडगाव मंडल अध्यक्षांनी चार हजार, शिरोडा, नुवें, फातोर्डा मंडल अध्यक्षांनी प्रत्येकी तीन हजार लोक येतील, अशी ग्वाही त्या त्या भागातील मंडल अध्यक्षांनी दिलेली आहे.
६ रोजी मडगाव येथे होणाऱ्या या विराट सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना ही जाहीर सभा होत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या प्रचाराचा नारळ या सभेतच फोडतील. प्रत्येक आमदार, मंत्र्यांनाही या सभेसाठी लोक जमवण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे, अशी माहिती मिळते.
भाजप पदाधिकाऱ्यांना अयोध्येला नेणारमुख्यमंत्र्यांनी पुढे असे सांगितले की,' भाजप पदाधिकाऱ्यांना येत्या विधानसभा अधिवेशन नंतर १२ व १६ फेब्रुवारी रोजी अयोध्येला नेण्यात येईल. नंतर टप्प्याटप्प्याने लोकांनाही अयोध्या यात्रा करण्याची संधी सरकार उपलब्ध करून देणार आहे.'