ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 4 - एकूण 11 लाख 10 हजार मतदारसंख्या असलेल्या गोव्यात सातव्या विधानसभेसाठी पहिल्या सहा ते साडेसहा तासांत सरासरी 54 टक्के मतदान झाले. नोटाबंदीच्या निर्णयानंतर गोवा आणि पंजाबमध्ये शनिवारी विधानसभेसाठी मतदान होत आहे. गोव्याची विधानसभा ही 40 सदस्यांची आहे. सकाळी सात वाजता गोव्यातील एकूण 1 हजार 642 मतदान केंद्रावरून कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदानास आरंभ झाला.
पहिल्या चार तासांत राज्यभर सरासरी 34 टक्के मतदान झाले. नंतरच्या दोन ते अडीच तासांत आणखी 20 टक्के मतदानाची भर पडली. पुरूषांपेक्षा जास्त महिला मतदानास येत आहेत. गोव्यातील बहुतेक मतदारसंघांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांचे प्रमाण जास्त आहे.
दक्षिण गोव्यातील मडगाव मतदारसंघात एका केंद्रावर खराब इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि तेथील कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या प्रक्रियेमुळे मतदान रद्द करावे लागले. त्या एकाच केंद्रावर नव्याने मतदान प्रक्रिया पार पडेल. अन्य काही केंद्रावरील खराब यंत्रे त्वरित बदलून मतदान प्रक्रिया पुढे सुरू ठेवली गेली.