किशोर कुबल, लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : ऑगस्ट महिन्यात महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या गोवा दौऱ्यावर ५६ लाख रुपये खर्च झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सर्वसाधारण प्रशासन विभागाकडून आरटीआय अर्जाला उत्तरादाखल मिळालेल्या माहितीवरून असे स्पष्ट झाले की, राष्ट्रपतींच्या ताफ्यातील सदस्य तसेच सुरक्षा व्यवस्थेवरच जास्त खर्च झाला. त्यांच्या सुरक्षा वाहन ताफ्यावर तब्बल २६,४८,१५२ रुपये खर्च करण्यात आले.
राष्ट्रपतींचे गोव्यातील राजभवनावर २२ ते २४ ऑगस्ट असे तीन दिवस वास्तव्य होते. त्यांच्या ताफ्यातील सदस्यांसाठी सिदाद द गोवा हॉटेलमध्ये २९ खोल्या आरक्षित केल्या होत्या. त्यावर ११ लाख ४७ हजार १९६ रुपये तर राष्ट्रपतींनी आणलेल्या भारतीय हवाई दलाच्या विमानातील कर्मचाऱ्यांच्या निवासावर ३ लाख ९५ हजार ९०० रुपये खर्च करण्यात आले आहेत. 'आयएनएस हंसा तळावर जेवण व रिफ्रेशमेंटसाठी १,९३,६२० रुपये खर्च केले.
कर्मचाऱ्यांसाठी सहा एसयूव्ही
राष्ट्रपतींच्या विमानातील कर्मचाऱ्यांच्या दिमतीला ६ एसयूव्ही वाहने देण्यात आली. त्यावर १,६२,२०९ रुपये खर्च केले. राजभवनवर पाहुण्यांची ने-आण करण्यासाठी २२ एसयूव्ही मोटारी तैनात केल्या होत्या. त्यावर ५.७८४१८ रुपये खर्च केले.
अशी होती वाहन व्यवस्था
राष्ट्रपतींच्या दौयात पर्यटन विकास महामंडळाने वाहने उपलब्ध करण्याची जबाबदारी सांभाळली. २७ एसयूव्ही (इनोव्हा क्रीस्टा), ३ बीएमडब्ल्यू १ उघडी थार जीपगाडी व १ उघडा ट्रक सुरक्षा व्यवस्थेसाठी वापरण्यात आला. राष्ट्रपतींच्या बॅगा व इतर साहित्यासाठी ६ टेम्पो वापरण्यात आले.
दोन लाखांचे पेंटिंग भेट!
गोवा सरकारतर्फे महामहीम राष्ट्रपतींना भेट म्हणून २ लाख रुपयांचे पेंटिंग देण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही चित्रकृती राष्ट्रपती मुर्मू यांना भेट देण्यात आली. राष्ट्रपतींना पेंटिंग भेट देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी अखेरच्या क्षणी घेतला. त्यामुळे थेट खरेदी करण्यात आली. लिझल कोता डिकॉस्ता यांच्याकडून ही चित्रकृती खरेदी करण्यात आली. राष्ट्रपतींच्या ताफ्यातील सदस्यांना जलसफरी घडवून आणल्या. त्यावर ४१,३९० रुपये खर्च झाले आहेत.
ही बिले मुख्यालय देणार
दरम्यान, हवाई ताफ्यातील कर्मचाऱ्यांचा निवास, वाहने यांवर खर्च केलेल्या ५.५८.१९९ रुपयांची बिले सर्वसाधारण प्रशासन विभागाकडून दिल्लीला हवाई वाहतूक मुख्यालयाला पाठविली जाणार आहेत, असे सांगण्यात आले.