म्हापसा - जगप्रसिद्ध अशा कळंगुट किनारी भागात येणा-या पर्यटकांना भटक्या कुत्र्यांपासून होणारा उपद्रव दूर करण्यासाठी व त्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी ६ हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याची योजना कळंगुट पंचायतीच्यावतीने हाती घेण्यात येणार आहे.
वर्ल्ड वाईड व्हॅटरनरी सर्विस या संस्थेच्या संयुक्त विद्यमान कळंगुट पंचायत निर्बीजीकरण योजना हाती घेणार आहे. उपसभापती मायकल लोबो यांच्या हस्ते सोमवारी त्याचे विधीवत उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती कळंगुट पंचायतीचे सरपंच शॉन मार्टीन्स यांनी दिली. वर्ल्ड वाईड व्हॅटरनरी सर्विस यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार पंचायत क्षेत्रातील सिकेरी ते बागा क्षेत्रात ६ हजाराहून जास्त भटकी कुत्रे आहेत. यातील २ हजार फक्त कळंगुट किनारपट्टीत असल्याची माहिती मार्टीन्स यांनी दिली.
या भटक्या कुत्र्यांचा सर्वात जास्त उपद्रव किना-यावर येणा-या पर्यटकांना सहन करावा लागतो. अनेकवेळा त्यांचा चावा घेण्याचे तसेच त्यांच्या सामानाची नासधूस करण्याचे प्रकारही घडल्याचे ते म्हणाले. वाढत्या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने व पर्यटकांना सुरक्षीत वातावरणात पर्यटनाचा आस्वाद घेता यावा यासाठी निर्बीजीकरण हाती घेण्यात आले आहे. भटक्या कुत्र्यामुळे पर्यटन व्यवसायिकांवर सुद्धा त्याचे परिणाम झाले आहेत.
निर्बीजीकरणा सोबत कुत्र्यांना रॅबीजचे इंजेक्शन सुद्धा देण्यात येणार आहे. जेणे करुन कुत्रा चावल्यास त्याचे विपरीत परिणाम होणार नाही. योजना सुरु करण्या मागचा हेतू स्पष्ट करताना कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवणे हा असल्याचे ते म्हणाले. सदर संस्थेने निर्बीजीकरणासाठी वाहनात मिनी आॅपरेशन थिएटर थाटले असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील एक महिना ही योजना सुरु राहणार असून गरज पडल्यास त्यात मुदत वाढ सुद्धा देण्यात येणार आहे. तसेच निर्बीजीकरण केलेल्या प्रत्येक कुत्र्यावर तांबड्या रंगाची निशाणी लावण्यात येणार असल्याची माहिती मार्टीन्स यांनी दिली.