वास्को: गुरूवारी (दि.१) पहाटे सुरू झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यात मुरगाव तालुक्यातील विविध भागात सहा झाडे कोसळली. विविध ठीकाणी कोसळलेल्या सहा झाडापैंकी पाच लोकांच्या घरावर कोसळल्याने त्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागले. वेळसांव येथील एका चर्चबाहेर उभ्या चारचाकीवर सकाळी ७ वाजता माड कोसळल्याने चारचाकीत असलेल्या वृद्ध जोडप्यापैकी महिला जखमी झाली असून तिच्यावर इस्पितळात उपचार करून नंतर घरी पाठवण्यात आलं.
गुरूवारी सुरू झालेल्या वादळी वारे आणि मुसळधार पावसाच्या दरम्यान वास्कोतील विविध ठिकाणी पाच झाडे घरावर कोसळण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने घरावर झाडे कोसळण्याच्या घटनेत कुठल्याच प्रकारची जिवीतहानी झाली नाही, मात्र घरांचे नुकसान झाल्याची माहीती अग्निशामक दलाच्या अधिकाºयांकडून प्राप्त झाली. सकाळी ७ च्या सुमारास गांधीनगर, वास्को येथील कंठेश्वर मंदिरासमोरील एका घरावर फणसाचे झाड कोसळल्याने त्या घराची सुमारे १० हजाराची आर्थिक नुकसानी. तसेच मांगोरहील येथील गणपती मंदिराच्या मागील एका घरावर कडुलिंबाचे झाड कोसळून त्या घराला १५ हजाराची नुकसानी झाल्याची माहीती अग्निशामक दलाच्या अधिकाºयांनी दिली. त्यानंतर मोगाबाय, बायणा येथील एका घरावर माड कोसळून त्या घराला २० हजाराची आर्थिक नुकसानी झाली तर काटेबायणा येथील अन्य एका घरावर माड कोसळून ५ हजाराची नुकसानी झाली.
बायणा येथे असलेल्या सांडपाणी प्रक्रीया प्रकल्पाजवळील अन्य एका घरावर माड कोसळून त्यांच्या घराला ५ हजाराची नुकसानी झाल्याचे अग्निशामक दलाच्या अधिकाºयांनी सांगितले. वास्कोतील विविध भागात पाच ठीकाणी झाडे कोसळून पाच घरांना नुकसानी झाली, मात्र सुदैवाने त्यात कुठल्याच प्रकारची जिवीतहानी झाली नसल्याची माहीती अग्निशामक दलाकडून प्राप्त झाली. सकाळपासून वास्कोतील विविध भागात पाच झाडे घरावर कोसळण्याची माहीती अग्निशामक दलाला मिळाल्यानंतर त्यांनी त्वरित घटनास्थळावर धाव घेऊन झाडे कापून ती तेथून हटवली.
सुदैवाने बचावले
गुरूवारी सकाळी ७ वाजता वेळसांव येथील पेद्रुआंतोनी फर्नांडीस आणि मारीया मारकीस हे वृद्ध जोडपे चारचाकीने ‘अवर लेडी आॅफ अझप्शन’ चर्चमध्ये प्रार्थना सभेसाठी गेले होते. ते जोडपे चर्चच्या बाहेरील परिसरात पोचल्यानंतर चारचाकीमध्येच असताना त्यांच्या चारचाकीवर माड कोसळला. चारचाकीवर माड कोसळल्याने त्यांच्या वाहनाची नुकसानी होण्याबरोबरच ते जोडपे वाहनात अडकले. सूत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार मारीया याच्या खांद्याला माड कोसळल्याने जखमा झाल्याने त्यांना त्वरित उपचारासाठी मडगावच्या हॉस्पिसीयो इस्पितळात नेण्यात आले. तिच्यावर तेथे उपचार करून नंतर तिला घरी पाठवल्याची माहीती प्राप्त झाली. त्या घटनेतून ते वृद्ध जोडपे ‘बाल बाल बचावले’ असेच गावातील लोक म्हणत आहेत. तो माड कोसळण्यापूर्वी अन्य एका माडाला धडकल्याने आणि नंतर तो तेथे असलेल्या कुंपणाला स्पर्श होऊन चारचाकीवर कोसळल्याने सुदैवाने येथे होणारा मोठा अनर्थ टळल्याचे त्याभागातील काही लोकांनी पत्रकारांना सांगितले.