लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : सां जुझे दि आरियल-बेनाभाट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवजी महाराजांच्या पुतळ्याला कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मायणा-कुडतरी पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक अरुण देसाई यांच्यासह तब्बल ६० पोलिसांचा फौजफाटा इथे तैनात केला आहे.
सोमवार, दि. १९ रोजी स्थानिकांनी छत्रपतींच्या पुतळा उभारणीला विरोध करत मंत्री सुभाष फळदेसाई यांच्यावर हल्ला केला होता, त्यानंतर प्रशासनाने दखल घेत सरपंच, उपसरपंचांसह २० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सध्या बेनाभाट परिसरात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक देसाई सकाळी ८ ते रात्री १२ वाजेपर्यंत त्या ठिकाणी नजर ठेवून असतात. दिल्लीत प्रशिक्षण घेतलेल्या पोलिसांना पुतळ्याच्या सुरक्षेची जबाबदारी दिली आहे.
ग्रामस्थांची बैठक
पुतळ्याच्या वादानंतर सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे. त्यामुळे प्रकरणासंदर्भात चर्चा करण्यासाठी आज, गुरुवारी पादीभाट येथे ग्रामस्थांची एक बैठक होणार आहे. तर रविवार, दि. २५ रोजी विशेष ग्रामसभाही बोलविण्यात आली आहे. या सभेत सरपंच, उपसरपंचासह २० जणांवरील गुन्हे मागे घ्यावेत तसेच छत्रपतींच्या पुतळ्याच्या परवान्यासंदर्भात चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.