लोकमत न्यूज नेटवर्क सावईवेरेः असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगाव येथील श्री लईराई देवीचा सुप्रसिद्ध जत्रोत्सव सोमवार, २४ रोजी होणार असून, सावईवेरे येथील श्री लईराई देवीच्या जत्रोत्सवात अग्निदिव्यासाठी सुमारे ७२ धोंड भाविक सज्ज झाले आहेत. रविवारी धोंडांचे 'व्हडले जेवण' आहे.
सावईवेरे परिसरातील सुमारे ७२ धोंड गुरुवारपासून सावईवेरे येथील श्री सातेरी देवस्थानच्या प्राकारात एकत्रितपणे लईराई देवीचे व्रत करीत आहेत. यात १० वर्षांपासून ते ७५ वर्षांपर्यंतच्या पुरुष, तसेच स्त्रियांचाही सहभाग आहे. गेली सुमारे ७८ वर्षे श्री सातेरी देवस्थानात सावईवेरे येथील धोंड भाविक देवीचे कडक व्रत पाळत आले आहेत. हे धोंडगण गेले तीन दिवस येथील सातेरी देवस्थानच्या प्रकारात मंडप उभारून एकत्रितपणे व्रत करीत आहेत. सावईवेरे येथील गुरुदास कडेकर हे गेली अनेक वर्षे धोंड भक्तांच्या आंघोळीसाठी तसेच जेवणादी कार्यक्रमासाठी मोफत पाण्याची व्यवस्थाही करीत आहेत.
जत्रोत्सवापूर्वी महिनाभर म्हणजे गुढीपाडव्यापासून लईराईचे धोंड व्रत पाळत असतात. जत्रोत्सवापूर्वी चार दिवस हे व्रत अत्यंत कडक स्वरूपाचे असते. जेवण्यापूर्वी अंघोळ करतात व ओल्यानीच जेवणादी कार्यक्रम उरकतात. अनवाणी कुठेही फिरत नसतात. विशेष म्हणजे, धोंड मंडळीच जेवण बनवतात. उद्या सोमवारी सर्व धोंड श्री शांतादुर्गा, लईराई व अनंत देवाचा जयघोष करीत शिरगावला जातील अशाप्रकारे नियोजन केले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"