पणजी : गोवा सरकारच्या पर्यटन खात्याने 2011 साली अमेरिकेत रोड शो आयोजित करण्यावर एकूण 86 लाख रुपयांचा खर्च केला होता. यावेळी मात्र अमेरिकेतील रोड शोवर खात्याने 75 लाखांचा खर्च केला आहे, अशी माहिती पर्यटन खात्याचे मंत्री बाबू आजगावकर यांनी शुक्रवारी येथे जाहीर केली आहे.2011 साली राज्यात काँग्रेसचे सरकार अधिकारावर असताना डॉलरची किंमत 42 रुपये होती. आता डॉलरची किंमत 69 रुपये झालेली आहे. तरी देखील रोड शोवर यावेळी 75 लाख म्हणजे 2011 च्या तुलनेत 11 लाख कमी खर्च झाला आहे, असा दावा मंत्री आजगावकर यांनी केला. वास्तविक यावेळी डॉलरची किंमत वाढलेली असल्याने जास्त खर्च व्हायला हवा होता पण आम्ही तो जास्त होऊ दिला नाही. पूर्वी विदेशात पर्यटन खात्याकडून खूप रोड शो व प्रदर्शने आयोजित केली जात असे. आपण पर्यटन मंत्री झाल्यानंतर हे प्रमाण कमी केले असाही दावा मंत्री आजगावकर यांनी केला आहे. विरोधी काँग्रेस पक्षाने गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन मंत्री आजगावकर यांच्याकडे रोड शोवरील खर्चाचा हिशेब मागितला आहे. त्या अनुषंगाने बोलताना मंत्री आजगावकर यांनी खरे म्हणजे काँग्रेसने 2011 सालच्या दोन रोड शोवरील खर्चाचा हिशेब द्यायला हवा, असे प्रत्युत्तर दिले आहे.अमेरिकेला रोड शोसाठी गेल्या आठवडय़ात मंत्री आजगावकर यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव धमेंद्र शर्मा, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमन निलेश काब्राल आणि पर्यटन खात्याचे एक उपसंचालक गेले होते. त्यांचा खर्च पर्यटन खात्याने केला पण आपल्यासोबत आपले काही कुटूंबिय अमेरिकेला गेले होते, त्यांचा खर्च सरकारी तिजोरीतून झालेला नाही, असे मंत्री आजगावकर म्हणाले. आपल्या कुटूंबियांचा खर्च हा कुटूंबियांनी केला असून पर्यटन खात्याच्या सरकारी दौ:याशी त्यांचा संबंध येत नाही, असे आजगावकर म्हणाले. विरोधी काँग्रेस याबाबतची माहिती पुढील विधानसभा अधिवेशनातही विचारू शकतो. त्या पक्षाचे आमदार दयानंद सोपटे यांनी विधानसभेत त्याबाबतचा प्रश्न उपस्थित करावा, आपण उत्तर देईन, असे आजगावकर म्हणाले. माहिती हक्क कायद्याखालीही ते माहिती मिळवू शकतात, असेही मंत्री आजगावकर यांनी नमूद केले.
गोव्याच्या पर्यटन खात्याकडून अमेरिकेतील रोड शोवर 75 लाखांचा खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2018 1:13 PM