किशोर कुबल, लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : कोविड महामारीच्या काळात व्यवसाय बंद ठेवावा लागल्याने फटका बसलेल्या विक्रेत्यांना सरकारने पाच हजार रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले होते. या पॅकेजचा ७५,७५७ जणांनी लाभ घेतला असून, ३७ कोटी ८७ लाख ८५ हजार रुपये वितरित झालेले आहेत.
समाज कल्याण खात्याकडून आरटीआय अर्जाला मिळालेल्या उत्तरातून ही माहिती मिळाली आहे. फळ, भाजी विक्रेते, मासळी विक्रेते, तसेच फुले व इतर वस्तू विकणारे, जत्रा, तसेच फेस्तात खाजे, लाडू, चणे विकणारे व इतर मिळून ६० प्रकारच्या लहान व्यावसायिकांना या पॅकेजचा लाभ देण्यात आला.
२०१९ ते २०२० दरम्यान कोविड महामारीच्या काळात सर्वच व्यवहार बंद राहिल्याने, तसेच धंदा बंद ठेवावा लागल्याने लोकांचे आर्थिक नुकसान झाले होते. सरकारने नंतर अशा लहान व्यावसायिकांसाठी समाज कल्याण खात्याच्या माध्यमातून प्रत्येकी पाच हजार रुपये पॅकेज जाहीर केले होते.
सासष्टीत सर्वाधिक लाभधारक
आरटीआय अर्जाला मिळालेल्या उत्तरातून असे स्पष्ट झाले आहे की, सासष्टी तालुक्यात सर्वाधिक ११,६७७ विक्रेत्यांनी याचा लाभ घेतला. त्यापाठोपाठ फोंडा तालुक्यात ९,१५५ व बार्देश तालुक्यात ८,३९६ व्यावसायिकांना लाभ मिळाला.
प्रक्रिया सुलभ केल्याने वाढले लाभार्थी
दरम्यान, हे पॅकेज जाहीर झाल्यानंतर व्यावसायिकांनी सोपस्कारांविषयक कटकटींबद्दल तक्रार केल्यावर सरकारने काही गोष्टी शिथिल केल्या होत्या व पॅकेजसाठी सोपस्कार सुटसुटीत केले होते. पंचायत सचिवांची एनओसी, प्रतिज्ञापत्र सादर करणे यापासून सूट देण्यात आली व केवळ राजपत्रित अधिकाऱ्याने संबंधित व्यावसायिकाला ओळखत असल्याचे प्रमाणित केल्यास हे पॅकेज मिळू शकेल, अशी सोय केली. त्यामुळे अधिकाधिक प्रमाणात अर्ज आले.