लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : शेजाऱ्याकडून होत असलेल्या छळवणुकीविरोधात आणि स्वतःच्या घराचे संरक्षण करण्यासाठी सांगे येथील धनगर समाजातील बोमी झोरे या ज्येष्ठ महिलेने येथील आझाद मैदानावर बुधवारी मूक आंदोलन केले. ७५ वर्षीय या महिलेला सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोण यांच्यासह इतरांनी पाठिंबा दिला. अधिकारी असलेल्या शेजाऱ्याविरोधात अनेकदा तक्रारी करूनही कारवाई केली जात नसल्याची कैफियत त्यांनी मांडली.
बोमी झोरे म्हणाल्या, 'गेली अनेक वर्षे शेजारी आमची सतावणूक करतात. आमचे घर मोडण्यासाठी शेजारी आणि काही अधिकाऱ्यांकडून सतावणूक केली जात आहे. मुलींची लग्ने झाली असून, मी एकटी आहे. घर वाचवण्यासाठी मी २०२२मध्ये सर्व संबंधीत अधिकाऱ्यांसह स्थानिक पंच, आमदार तथा मंत्री सुभाष फळदेसाई तसेच मुख्यमंत्र्यांना निवेदने दिली आहेत. मात्र, या शेजाऱ्यावर अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही. शेजारी मारायला धावतो. त्यामुळे पोलिस स्थानकात तक्रार करायला गेल्यावर तक्रारही घेतली गेली नाही,' असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मी भाजपचीच मतदार आहे. निवडणुकी वेळी भाजपलाच मतदान केले. तरीही सतावणूक थांबत नाही, असा दावा झोरे यांनी केला. काही स्थानिकांच्या पाठिंब्यामुळे शेजाऱ्यावर कारवाई होत नाही, असे त्या म्हणाल्या.
सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर म्हणाले की, 'एका बाजूने सरकार ज्येष्ठांसाठी विविध उपक्रम राबवते आणि धनगर समाजाच्या या ज्येष्ठ महिलेला हक्कांसाठी लढावे लागले, हे दुर्दैवी आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी सुडाचे राजकारण करीत असावेत. त्या महिलेला न्याय मिळेपर्यंत आम्ही लढा देऊ,' असे त्यांनी सांगितले.
झोरे यांना न्याय मिळवून देऊ : बाबू कवळेकर
'आमच्या धनगर समाजाच्या ७५ वर्षीय महिलेला न्यायासाठी आझाद मैदानावर आंदोलन करावे लागले, हे दुर्दैव आहे,' असे माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी सांगितले. कवळेकर यांनी बोमी झोरे यांची भेट घेतली. ते म्हणाले की, 'एक ज्येष्ठ महिला आंदोलन करीत असल्याचे समजताच आम्ही त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आलो. त्यांना न्याय देण्यासाठी संबंधीत सरकारी अधिकाऱ्यांकडून याची खरी माहिती जाणून घेऊ. तसेच मुख्यमंत्र्यांना याची माहिती दिली जाईल. खरोखरच त्यांच्यावर अन्याय झाला असेल तर पूर्ण सहकार्य करून त्यांना न्याय मिळवून देऊ. ज्येष्ठांची अशी सतावणूक कोणीही करू शकत नाही,' असे कवळेकर यांनी सांगितले.
ज्येष्ठ महिलेला आपल्या हक्कासाठी आझाद मैदानावर आंदोलन करावे लागत आहे हे सरकारचे अपयश आहे. सरकार आज सर्वसमान्यांना सुरक्षा देत नाही. या महिलेला त्यांच्या शेजाऱ्यांकडून धमकी तसेच त्रास दिले जातो. त्यांचे घर मोडण्यासाठी दबाव आणला जातो. तिच्याच घरात शौचालयाला जायला दिले जात नाही. याविषयी तक्रारी करूनही दखल घेतली न जाणे हे धक्कादायक आहे. - बिना नाईक, काँग्रेस.